गणपत गल्ली येथील प्रकार : दुरुस्तीची मागणी
बेळगाव : गणपत गल्ली येथील पाण्याच्या व्हॉल्वमधून शेकडो लिटर पाणी मंगळवारी वाया गेले. वर्दळीच्या ठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने बाजारपेठेत चिखल झाला होता. गणपत गल्लीत वारंवार पाण्याची गळती होत असून यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. गणपत गल्ली-खडेबाजार कॉर्नर येथे मंगळवारी सकाळपासून जलवाहिनीला गळती लागली होती. मुख्य व्हॉल्वमधून शेकडो लिटर पाणी वाया जात होते. एकीकडे पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याचा जपून वापर करण्याची सूचना केली जात असताना दुसरीकडे मात्र दुरुस्तीअभावी शेकडो लिटर पाणी गटारीमध्ये मिसळले जात आहे.
गळती काढण्याची मागणी
मंगळवारी दुकाने बंद असली तरी रस्त्यावर विक्री करणाऱ्यांची संख्या मोठी होती. यामुळे वाहणाऱ्या पाण्यामधूनच वाट काढत नागरिकांना ये-जा करावी लागली. वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे ये-जा करणाऱ्यांवर पाणी उडत होते. त्यामुळे कायमस्वरुपी गळती काढण्याची मागणी केली जात आहे.









