केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ठोस आश्वासन : आमदार विठ्ठल हलगेकर यांचा पाठपुरावा : खानापूर-पणजी रस्ता कामाला लवकरच गती मिळणार
खानापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमेवत गोव्यात शनिवार दि. 23 रोजी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्यातील आंतरवाहतूक तसेच रस्त्याच्या समस्यांबाबत पणजी येथे बैठक पार पडली. बैठकीला खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर उपस्थित होते. खानापूर तालुक्यातून जाणाऱ्या आणि गोव्याला जोडणाऱ्या रस्त्यासंदर्भात निवेदन देवून सविस्तर चर्चा करून रस्त्यांची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी, व या रस्त्याच्या कामातील तांत्रिक अडचणी आणि अडथळे दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी आणि अभिजीत चांदीलकर उपस्थित होते. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर-पणजी व्हाया रामनगर रस्त्याचे गेल्या सहा वर्षापासून काम बंद होते. मागीलवर्षी पुणे येथील एम. व्ही. म्हात्रे या कंत्राटदाराने या रस्त्याचे बांधकाम अत्यंत धीम्यागतीने सुरू ठेवल्याने हा रस्ताही पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनलेले आहे. हा रस्ता येत्या दोन-तीन महिन्यात होणे अत्यंत गरजेचे असल्याचे केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी नितीन गडकरी यांनी या कंत्राटदाराला वेळेत काम करावे, अन्यथा कंत्राटदार बदलण्याच्या सूचना आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बेळगाव-गोवा रस्ताकामात वनखात्याची अडचण
बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे थांबलेले आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी 148 कोटीचा निधी मंजूर होऊनही या रस्त्याचे बांधकाम वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे बंद पडले आहे. यासाठी रस्ताकाम तातडीने होणे गरजेचे असल्याचे आमदार हलगेकर यांनी नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणले.
तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
यावेळी नितीन गडकरी यांनी हा रस्ता तातडीने सुरू करण्यासाठी योग्य क्रम हाती घेण्यात येईल. तसेच वनखात्याचा अडथळा दूर करण्यासाठी रस्त्याच्या विकासकामात बदल करून समांतर रस्ता करून या रस्त्याची तातडीने पूर्तता करण्यात येईल. यासाठी केंद्र सरकारच्या तसेच कर्नाटक सरकारच्या वनखात्याकडून अडथळे दूर करून घेण्यासाठी एनएचआयच्या अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करावे, आणि त्याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करून पाठपुरावा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहरांतर्गत रस्त्याचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी विठ्ठल हलगेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मराठा मंडळ कॉलेज ते गोवा क्रॉस रस्त्यापर्यंतचा आराखडा सादर करून यासाठी 20 कोटीचा निधी द्यावा, अशी मागणी केली.
आराखडा पाठवण्याची सूचना
यापूर्वी या रस्त्यासंदर्भात दिल्ली येथे भेटून चर्चाही केली होती. हा रस्ता पूर्वी राष्ट्रीय महामार्गाकडे होता. अलीकडे बेळगाव-गोवा नवा महामार्ग खानापूर शहराबाहेरुन गेल्याने हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतर केला. त्यामुळे या रस्त्याच्या विकासाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्गाकडे गेली. तातडीने 20 कोटी रुपये मंजूर करून या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी आमदार हलगेकर यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली. याबाबतही संपूर्ण रस्त्याचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करून आपल्या कार्यालयाला पाठवण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे याही रस्त्याचे काम सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच नागरगाळी-कटकोळ राज्य महामार्गात वर्गीकरण करून या रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजूर करावा. जर या रस्त्याचा विकास झाल्यास नागरगाळी, मेरडा, हलशी, नंदगड, पारिश्वाड भागातील गावांच्या रहदारीचा प्रश्न कायमचा निकालात लागणार आहे. हा रस्ता नागरगाळी येथून सुरू होऊन हिरेबागेवाडी येथे बेळगाव-बेंगलोर महामार्गाला जोडणार आहे. या रस्त्याबाबतही केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे आमदार हलगेकर यांनी पाठपुरावा केलेला आहे.
तसेच हेम्माडगा, सिंधनुर हा रस्ताही गोव्यासाठी एकदम कमी अंतराचा आहे. मात्र हा रस्ता जंगल प्रदेशातून जात असल्याने या रस्त्याला वनखात्याने आडकाठी केलेली आहे. सध्या हा रस्ता खानापूर तालुक्यातून आणि जोयडा तालुक्यातून जात असल्याने खानापूर तालुक्यातील हद्दीपर्यंत या रस्त्याची रुंदी एकदम कमी आहे. यासाठी रस्त्याची रुंदी वाढवून रस्ता केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करावा, आणि या रस्त्याचाही विकास केल्यास दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच या भागातील नागरिकांच्या जीवनमानात बदल होणार आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली.
केंद्रीय मंत्री गडकरींकडून सकारात्मक प्रतिसाद
या सर्व रस्त्यांच्या बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अत्यंत सकारात्मता दर्शविली असून या सर्व रस्त्याबाबत अधिकाऱ्यांना तातडीने क्रम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतिश जारकीहोळी यांच्याबरोबरही बैठक पार पडली आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे.









