ख्रिसमस-न्यू ईयरची लालूच : हॉटेलचालकाची सीईएन विभागात तक्रार दाखल
बेळगाव : हॉटेल आणि वेगवेगळ्या आस्थापनांच्या वेबसाईट हॅक करून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच आहेत. ख्रिसमस व न्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांनी बेळगाव परिसरातील एका नामांकित हॉटेलची वेबसाईट हॅक करून ग्राहकांना ठकविल्याची माहिती उघडकीस आली आहे. संबंधित हॉटेलचालकांनी शहर सीईएन विभागाकडे तक्रार केली असून या भामट्यांनी नेमक्या किती ग्राहकांची फसवणूक केली आहे, याची माहिती मिळविण्यात येत आहे. सीईएनचे पोलीस निरीक्षक संजू कांबळे व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. यापूर्वीही याच हॉटेलची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. गोव्याला पर्यटकांची पसंती असते. गोव्यात गर्दी झाल्यानंतर अनेक जण बेळगावच्या हॉटेलमध्ये बुकिंग करतात. बेळगाव-जांबोटी रोडवरील एका हॉटेलची वेबसाईट हॅक करून ग्राहकांना ख्रिसमस व न्यू ईयरसाठी अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. हॉटेलच्या वेबसाईटवरील सवलती पाहून अनेकांनी ऑनलाईन बुकिंग केले. भामट्यांनी दिलेल्या अकाऊंटवर ऑनलाईन पैसेही भरले. पैसे भरल्यानंतर त्यांना खोली क्रमांक कळविण्यात आले. ख्रिसमस साजरा करण्यासाठी जाणाऱ्या अनेकांनी हॉटेलच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आम्ही हॉटेलवर रहायला किती वाजता यायचे? अशी विचारणा केली. त्यावेळी तुमचे बुकिंगच झाले नाही तर तुम्ही कसे येणार? असा प्रश्न हॉटेल व्यवस्थापनाने उपस्थित केल्यानंतर आपण फसलो गेलो, हे ग्राहकांच्या लक्षात आले.
हॉटेलशी संपर्क साधल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस
एक-दोन दिवसांत अनेकांनी हॉटेलशी संपर्क साधून आपले बुकिंग खात्री करून घेताना फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून त्यानंतर संबंधितांनी शहर सीईएन विभागाशी संपर्क साधून घडल्या प्रकाराबद्दल तक्रार केली आहे. सवलतीच्या योजनेत हॉटेलमध्ये ख्रिसमस आणि न्यू ईयर साजरा करण्याची आशा बाळगून ऑनलाईन बुकिंग करणारे अनेक ग्राहक फशी पडले आहेत.









