वृत्तसंस्था/ मेलबर्न
पाकिस्तानची ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी मंगळवारच्या बॉक्सिंग डेपासून सुरू होत असून ऑस्ट्रेलियाविऊद्धचा 15 कसोटीतील पराभवाचा सिलसिला खंडित करण्याचे आव्हान पाहुण्यांसमोर आहे. नोव्हेंबर,. 1995 पासून त्यांना ऑस्ट्रेलियात विजय मिळवता आलेला नाही आणि संघाची सतत वाढत चाललेली दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी पाहता हे आव्हान पेलणे त्यांना बरेच जड जाईल.
पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नोमान अली आजारपण आणि दुखापतीमुळे उर्वरित ाालिकेतून माघार घेणारा दोन दिवसांत दुसरा खेळाडू ठरला आहे. डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाज हा अलीच्या जागी संघात स्थान घेईल, असे निवड समितीने सांगितले आहे. अली गेल्या आठवड्यात पर्थ येथे झालेल्या आणि 360 धावांनी पराभव स्वीकाराव्या लागलेल्या पहिल्या कसोटीत खेळू शकला नव्हता. त्याच्यावर शनिवारी मेलबर्नमध्ये अॅपेन्डिसाइटिसची शस्त्रक्रिया झाली आहे.
पर्थमधील आपल्या दमदार कसोटी पदार्पणात 128 धावा देऊन 5 बळी घेतलेला वेगवान गोलंदाज खुर्रम शहजाद बरगडीचा फ्रॅक्चर आणि स्नायू फाटल्याने मालिकेतील उर्वरित सामन्यातून बाहेर पडलेला असून त्यानंतर हा नवीन धक्का पाकला सहन करावा लागलेला आहे. पहिल्या कसोटीला मुकलेला लेगस्पिनर अबरार अहमदही पायाच्या दुखापतीमुळे या कसोटीतून बाहेर पडला आहे. वेगवान गोलंदाज नसिम शाह दीर्घकालीन दुखापतीमुळे बाहेर पडल्याने आणि हरिस रौफने दौऱ्यावरील संघात सामील होण्याऐवजी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानला कमकुवत गोलंदाजी विभाग घेऊन ऑस्ट्रेलियात यावे लागले आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने पहिल्या कसोटीदरम्यान गाझामधील पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ दंडाला काळी पट्टी बांधल्याबद्दल फटकारले होते आणि तो दुसऱ्या कसोटीत अशी काळी पट्टी परिधान करणार नाही अशी अपेक्षा आहे. कारण त्याने पुन्हा तसे केल्यास आयसीसीकडून त्याच्यावर निर्बंध येऊ शकतात. गेल्या आठवड्यात त्याने या मालिकेदरम्यान पुन्हा तसा ‘आर्मबँड’ घालण्याचा आपला कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. ऑस्ट्रेलिया या सामन्यासाठी संघात बदल न करण्याची शक्यता असून पाकिस्तानचा अंतिम संघ नाणेफेकीच्या वेळी निश्चित होईल.









