नेमका वास कोण घेत आहे? याबाबत उलटसुलट चर्चा : विषयाला बगल देऊन दुसऱ्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेतर्फे फुल मार्केटमध्ये अगरबत्ती उत्पादन उद्योग सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचे जोरदार उद्घाटन झाले. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून तो प्रकल्पच बंद असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत त्याबाबत चर्चा झाली. मात्र संबंधित अधिकाऱ्याने साऱ्यांचीच दिशाभूल करण्याचे उत्तर दिले. त्यावेळी त्या विषयाबाबत अधिक चर्चा न झाल्याने अगरबत्तीचा वास नेमका कोण घेत आहे? इतरवेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे स्थायी समितीचे चेअरमन आणि नगरसेवक त्या अधिकाऱ्याने उत्तर दिल्यानंतर त्याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे अगरबत्ती प्रकल्पाचा सुगंधदेखील इतर काही जण घेत आहेत का? याबाबत महानगरपालिकेमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
महानगरपालिकेतर्फे विविध प्रकल्प राबविण्याबाबत पर्यावरण विभागाला महापालिका आयुक्तांनी सूचना केली आहे. त्यानुसार प्रकल्प राबविण्याबाबतचा गवगवा केला जात आहे. मात्र अनेक प्रकल्प बंदच आहेत. याची माहिती नगरसेवकांना माहीत आहे. तरीदेखील संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मागचे नेमके कारण काय? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
खराब झालेल्या फुलांपासून अगरबत्ती तयार करण्यासाठी प्रकल्प घालण्यात आला. यासाठी 5 लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र त्यामधून आतापर्यंत पाच रुपयांचेही उत्पादन झाले नाही. त्यामुळे महानगरपालिकेला मोठा फटका बसला आहे. महत्त्वाचे म्हणजे याबाबत संबंधित कंत्राटदाराला विचारले असता त्याने उत्तर देण्याचे टाळले आहे. एकूणच या प्रकल्पामध्ये गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत एका नगरसेवकाने विचारले असता आजच मी संबंधित प्रकल्पाबाबत छायाचित्र पाठविल्याचे सांगून त्या अधिकाऱ्याने वेळ मारून नेली.
अगरबत्ती उत्पादन केल्यानंतर त्याची विक्री कोठे केली जाणार आहे? याचे उत्तरही महापालिकेकडे नाही. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नको ते प्रश्न करून स्थायी समितीचे चेअरमन तसेच नगरसेवक वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काम केले असे दाखवून प्रकल्पच बंद असल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे याचे गौडबंगाल काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शहर स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. मात्र अनेक ठिकाणी कचरा पेटवून दिला जात आहे. त्यामुळे पर्यावरण खराब होत आहे. संबंधित अधिकारी काम केल्याचा आव आणत आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणताही प्रकल्प आतापर्यंत यशस्वी झाला नाही, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. काही अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे तर काही अधिकाऱ्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
महापालिका आयुक्त या प्रकाराकडे लक्ष देणार का?
महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे या प्रकाराकडे लक्ष देणार का? वास्तविक अगरबत्ती प्रकल्पाला पुरस्कारही मिळाला आहे. मात्र हा प्रकल्प बंदच आहे. त्यामुळे संपूर्ण बेळगावच्या जनतेचा हा अवमान आहे. वास्तविक आरोग्य व शिक्षण स्थायी समितीच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरणे गरजेचे होते. मात्र जाणूनबुजून तो प्रश्न बाजूला ठेवण्यात आला. एकूणच बेळगावच्या जनतेचीच दिशाभूल होत असल्याचे दिसून येत आहे. इतका मोठा खर्च करण्यात येत आहे. त्यामधून मनपाला किती कर मिळाला आहे, हे आता संबंधित अधिकाऱ्याला विचारण्यात येणार आहे का? हे पहावे लागणार आहे.









