गुरुवारी पहाटेच उघडला दरवाजा : उत्पादन सुरू केल्याची अधिकाऱ्यांकडून माहिती
बेळगाव : अगरबत्ती प्रकल्प बंद असल्याबाबत माध्यमातून बातमी प्रसिद्ध होताच महानगरपालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. गुरुवारी सकाळीच जाऊन अगरबत्ती प्रकल्पाचा दरवाजा खुला करण्यात आला. त्यानंतर अगरबत्ती उत्पादनाच्या कामाला लागले आहेत. बंद असलेल्या प्रकल्पाबाबत गोंधळ उडणार, अशी भीती अधिकाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्याने आता अगरबत्ती उत्पादनाला सुरुवात केली आहे. मात्र, यात सातत्य राहणार आहे का? हे पहावे लागणार आहे. विक्री न झालेल्या खराब फुलांपासून अगरबत्ती उत्पादन करून महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवून देऊ, असे सांगण्यात आले. त्यानंतर महानगरपालिकेने त्याला हिरवाकंदील दिला होता. दोन महिन्यांपूर्वी फुल मार्केटमध्येच उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटन झाल्यानंतर आतापर्यंत त्याला कुलूपच ठोकण्यात आले होते. याबाबत अनेकांनी तक्रारीही केल्या होत्या. फुलविक्रेत्यांनीही हा प्रकल्प बंद असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर प्रत्यक्ष जाऊन छायाचित्रे घेण्यात आली. माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध करताच महानगरपालिकेला जाग आली. पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी, इतर साहाय्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळीच या प्रकल्पाचा दरवाजा खुला करून उत्पादन करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. मोठ्या थाटाने या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तो बंद ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. महापालिका सभागृह आणि महापालिका आयुक्तांचीही दिशाभूल करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले. हा प्रकल्प बंद होता, हे खरे आहे. त्यामुळे आता महापालिकेतील नगरसेवक आणि अधिकारी संबंधित विभागाला जाब विचारणार का? हे पहावे लागणार आहे. सध्या महापालिकेमध्ये राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्नही केला जात आहे. या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली चूक गंभीर आहे. उत्पादन घेऊन महापालिकेला मोठ्या प्रमाणात कर मिळवून देऊ, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कोणत्याच प्रकारचा कर महापालिकेला मिळालेला नाही.
प्रकल्प केवळ कागदावरच
महापौर शोभा सोमनाचे, आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह आता नगरसेवक याबाबत जाब विचारणार का? हे पहावे लागणार आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व प्रकल्पांना परवानगी देण्यात येत आहे. मात्र, अनेक प्रकल्प केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पांमधून कोणतेच उत्पादन नसल्याची चर्चा सध्या महापालिकेत सुरू आहे.









