नाल्याची रुंदी वाढविण्याबाबतही चर्चा : समस्या सोडविण्याचे आश्वासन
बेळगाव : वडगाव येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. याचबरोबर या स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याचा सर्व्हे, तसेच तेथे असलेल्या नाल्याचाही सर्व्हे करण्यासाठी महानगरपालिकेच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी बुधवारी दुपारी दाखल झाले होते. त्यांनी तेथील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर तुम्हीच सर्वांनी यावर तोडगा काढून आम्हाला कळवा, त्यानंतर सर्व कामे केली जातील, असे आश्वासन देण्यात आले. वडगाव येथील स्मशानभूमीला जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. तसेच त्या परिसरात अनेकजण घरांची बांधणी करत आहेत. मात्र रस्त्याला योग्य जागा सोडली जात नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचा सर्व्हे केला आहे. काही जणांनी यावेळी आपली जागा अधिक जात आहे, अशा तक्रारी केल्या. त्यांची समजूत काढण्यात आली आहे.
स्मशानभूमीमध्ये मोजक्याच शेगड्या आहेत. त्यामध्ये आणखी शेगड्या उभारण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आणखी शेगड्या उभारून स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करण्यासाठी पाऊल उचलू, असे आश्वासन देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे तेथूनच नाला आनंदनगरमधून बळ्ळारी नाल्याला जाऊन मिळतो. त्या नाल्यावर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे ते अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली आहे. त्या नाल्याच्या रुंदीची नोंद आहे. त्या रुंदीनुसारच नाला खोदाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत येथील जनतेची मतेही घेण्यात आली आहेत. तसेच सामंजस्याने नाल्याच्या खोदाईबाबत प्रश्न सोडवा, असे लक्ष्मी निपाणीकर यांनी तेथील नागरिकांना सांगितले. एकूणच या परिसरातील विविध समस्यांची पाहणी करून नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.









