केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
बेळगाव : केंद्र सरकारने 141 खासदारांना निलंबित करून लोकशाहीचा खून केला आहे. ही बाब लोकशाहीसाठी मारक आहे. सभागृहात आपल्या मर्जीतील विधेयक संमत करण्यासाठी केंद्र सरकारने हा डाव रचला आहे, असा आरोप करत सोशल डेमॉक्रॅटिक पार्टीतर्फे (एसडीपी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. लोकसभेमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केंद्रातील भाजप सरकारने एकाधिकारशाही चालविली आहे. केंद्र सरकारला जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाला केंद्र सरकारकडून लक्ष्य करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एकाधिकारशाहीमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असे सांगत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करून संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने सभागृहातील 141 विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करून सभागृहात महत्त्वाचे विधेयक आणण्याचा डाव रचला आहे. यासाठीच खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या धोरणाला तीव्र विरोध असल्याचे सांगत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.









