पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 बरोबरी : आज उभय संघात रंगणार अंतिम सामना
वृत्तसंस्था/ तारुबा, वेस्ट इंडिज
येथे झालेल्या चौथ्या टी 20 सामन्यात इंग्लंडने यजमान वेस्ट इंडिजवर 75 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 267 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्य गाठताना विंडीजचा डाव 192 धावांवर आटोपला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. आज उभय संघात पाचवा व अंतिम सामना होईल.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश फलंदाजांनी यजमान विंडीजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सलामीवीर फिल सॉल्ट व कर्णधार जोस बटलर यांनी 117 धावांची सलामी दिली. सॉल्टने शानदार शतकी खेळी साकारताना 57 चेंडूत 7 चौकार व 10 षटकारासह 119 धावा केल्या. कर्णधार बटलरने 29 चेंडूत 55 धावांचे योगदान दिले. बटलर बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या विल जॅक्सने अवघ्या 9 चेंडूत 24 धावा फटकावल्या. तर लिव्हिंगस्टोननेही तुफानी फटकेबाजी करताना 21 चेंडूत नाबाद 54 धावा साकारल्या. यामुळे इंग्लंडने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 267 धावांचा डोंगर उभा केला.
या विजयी आव्हानाचा पाठलाग करताना विंडीज फलंदाजांनीही फटकेबाजी केली पण ठराविक अंतराने त्यांच्या विकेट्स गेल्याने त्यांचा डाव 15.3 षटकांत 192 धावांवर संपुष्टात आला. विंडीजतर्फे आंद्रे रसेलने सर्वाधिक 51 धावांचे योगदान दिले. निकोल्स पूरनने 39 तर रुदरफोर्डने 36 धावा केल्या. इतर खेळाडूंनी मात्र निराशा केल्याने विंडीजला 75 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकांत 3 बाद 267 (फिल सॉल्ट 119, जोस बटलर 55, विल जॅक्स 24, लिव्हिंगस्टोन नाबाद 54, होल्डर, रसेल व होसेन प्रत्येकी एक बळी).
वेस्ट इंडिज 15.3 षटकांत सर्वबाद 192 (आंद्रे रसेल 51, निकोलस पूरन 39, रुदरफोर्ड 36, टोप्ले 3 तर सॅम करन, रेहान अहमद प्रत्येकी दोन बळी).









