वृत्तसंस्था/ चेन्नई
भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये दुसरा विजय नोंदवताना पाचव्या फेरीत सर्बियाच्या सॅनन सुगिरोव्हवर मात केली.
या विजयाच्या पूर्ण गुणानंतर 17 वर्षीय गुकेशचे 3.5 गुण झाले असून आठ खेळाडूंमध्ये त्याने अग्रस्थान मिळविले आहे. त्याने काळ्या मोहरांनी खेळताना सुगिरोव्हला 40 चालीत हरविले. यामुळे कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याची त्याची आशा बळावली आहे. या स्पर्धेतील पहिले तीन सामने त्याने अनिर्णीत राखल्यानंतर त्याने पहिला विजय मिळविला होता. पी. हरिकृष्ण चौथ्या फेरीअखेर संयुक्त आघाडीवर होता, त्याची आता दुसऱ्या स्थानावर घसरण झाली असून त्याचे 3 गुण झाले आहेत. पाचव्या फेरीत त्याला इराणच्या परहॅम मॅघसूदलूने बरोबरीत रोखले. युव्रेनच्या पॅव्हेल इलॅनोव्हचे 3 गुण झाले असून त्याने सर्बियाच्या अलेक्झींडर प्रेडकेचा पराभव केला. कँडिडेट्स पात्रतेचा आणखी एक दावेदार अर्जुन इरिगेसी व अमेरिकेचा लेव्हॉन अॅरोनियन यांचा डाव अनिर्णीत राहिला. पाच फेऱ्यानंतर दोघांचेही 2.5 गुण झाले आहेत.









