धामणे धनगरवाड्यात सौरउर्जा प्रकल्प सुरू : वनखात्याच्या जाचक अटींमुळे वीजपुरवठा सुरू करण्यात ठरला होता अडथळा
वार्ताहर /किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील धामणे धनगरवाडा गावात तब्बल 100 वर्षांनंतर विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावात प्रकाश पडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. बेळगावात झालेल्या अधिवेशनच्या कालावधीत गेल्या पाच-सहा दिवसापूर्वी गावात सौरउर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळूनही बेळगावातील सीमेवर असणाऱ्या धनगरवाडा गावात विद्युत पुरवठा नव्हता. यामुळे इथल्या नागरिकांना स्वातंत्र्यानंतरही अंधारातच जीवन जगावे लागत होते. गावात विद्युत पुरवठा नसल्यामुळे आपण अदिवासी असल्याचा भास इथल्या नागरिकांना नेहमीच होत होता. गेल्या कित्येक वर्षापासून धनगरवाडा गावातील नागरिक आपल्या गावाला वीजपुरवठा सुरू करा, अशी मागणी करत होते. मात्र जंगल परिसरात असलेल्या या गावात वनखात्याच्या काही अटींमुळे वीजपुरवठा सुरू करण्यात आला नाही. धनगरवाडा हे गाव बेळवट्टी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येते. या गावात सुमारे 70 मतदार आहेत. जंगल भागात असलेल्या या गावात वीजपुरवठा नसल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन सध्या गावामध्ये सौरउर्जा प्रकल्प राबविण्यात आले आहे. सौरउर्जेच्या माध्यमातून गावात विद्युतपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
उर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
उर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, हेस्कॉमचे मोहम्मद रोशन, अभियंता प्रकाश व्ही., ग्रा. पं. सदस्य धनगरवाडा व धामणे एस गावातील प्रमुख पंच गावडू हाजगोळकर तसेच झिलू कोकरे, रोगाप्पा कोकरे, बाबू कोकरे, सुनिल कोकरे आदी उपस्थित होते. उर्जा मंत्री व उपस्थित मान्यवरांचे गावकऱ्यांनी मोठ्या थाटात स्वागत केले. तसेच या गावात कायमस्वरुपी वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही यावेळी मंत्रीमहोदयांकडून गावकऱ्यांना मिळाले आहे.
अखेर गावच्या मागणीला यश- सोनाप्पा कोकरे, धनगरवाडा
आमच्या गावात वीजपुरवठा नव्हता. देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र आमच्या गावाला वीजपुरवठा मिळालेला नाही. याची खंत आम्हा साऱ्यांनाच होती. बरेचसे वडीलधारी मंडळींची गावात विजेचा दिवा पाहण्याआधीच प्राणज्योत मालवली. गावात वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, यासाठी त्यांनी अनेकवेळा प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या मागणीला आता यश आले आहे. गावात सौर उर्जेच्या माध्यमातून 22 ठिकाणी विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत.









