प्रतिनिधी/ बेळगाव
‘त्या’ निंद्य घटनाप्रकरणी काकती पोलिसांनी शनिवारी दोन महिलांसह तिघा जणांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे. उच्च न्यायालयाने या निंद्य प्रकाराची गंभीर दखल घेतल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
लक्काप्पा नायक (वय 24), लक्कव्वा यल्लाप्पा नायक (वय 40), शोभा राजाप्पा नायक (वय 47) सर्व राहणार न्यू वंटमुरी अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व कृष्ण दीक्षित यांचा समावेश असलेल्या न्यायपीठाने स्वत:हून याचिका दाखल करून घेऊन यंत्रणेला खडसावले होते.
या घटनेनंतर लगेच काकती पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. शनिवारी दोन महिलांसह तिघा जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील आणखी दोघे जण फरारी आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना घडलेल्या या अमानवी घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत.
पीडित महिलेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. यासंबंधी काकतीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर यांच्यावर शुक्रवारी रात्री निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सध्या बेळगाव ग्रामीणचे एसीपी गिरीश एस. व्ही. यांच्यावर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार यांच्यावर काकती पोलीस स्थानकाच्या प्रभारी निरीक्षकपदाचा भार सोपविण्यात आला आहे.









