पाच वर्षात दीड हजारहून अधिक रेल्वेचालक मद्यचाचणीत दोषी
प्रतिनिधी/ बेळगाव
मद्यपी लोकोपायलटवर नियंत्रण राहावे, यासाठी रेल्वेकडून ठिकठिकाणी ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी केली जाते. मागील पाच वर्षात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये देशभरात 1761 लोकोपायलटनी मद्यसेवन केल्याचे आढळून आले आहे. यामध्ये नैर्त्रुत्य रेल्वेतील 15 लोकोपायलटचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होत आहे.
रेल्वेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम लोकोपायलटच्या हाती असते. समोर येणाऱ्या अडथळ्यांवर लक्ष ठेवून त्यातून मार्ग काढण्याचे जबाबदारीचे काम ते करत असतात. त्यांच्या विश्वासावरच रेल्वेमध्ये हजारो प्रवासी प्रवास करत असतात. परंतु, काही लोकोपायलट मद्यसेवन करून कामावर येत असल्याचे मागील काही दिवसात दिसून आले आहे. अशा लोकोपायलटवर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे विभागाने ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी सुरू केली आहे.
मागील पाच वर्षात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वात अधिक नॉर्दर्न रेल्वेमध्ये 521 लोकोपायलट मद्यसेवन करून इंजिनमध्ये दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तामध्ये ही धक्कादायक माहिती दिली आहे. यामुळे रेल्वेच्या इंजिनमध्ये जाण्यापूर्वी प्रत्येक लोकोपायलटची तपासणी करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.









