‘वनडे’ संघात दीपक चहरच्या जागी आकाशदीप
वृत्तसंस्था/ मुंबई
दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारताला याकामी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची सेवा मिळणार नाही. कारण शनिवारी वैद्यकीय पथकाने या वरिष्ठ वेगवान गोलंदाजाला सहभागी होण्याच्या दृष्टीने संमती न दिल्याने तो दोन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला असून तसे बीसीसीआयने जाहीर केले आहे.
नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत प्रभावी कामगिरी केल्यानंतर घोट्याच्या दुखापतीतून सावरणाऱ्या शमीचा यापूर्वी भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. परंतु त्याची उपलब्धता त्याला बोर्डाच्या वैद्यकीय पथकाकडून मंजुरी मिळते की नाही यावर अवलंबून होती. बीसीसीआयने शमीच्या जागी दुसऱ्या कोणाला निवडलेले नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये, तर दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून केपटाऊन येथे सुरू होणार आहे.
दुसरीकडे, वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू दीपक चहरने कुटुंबातील आणीबाणीच्या परिस्थितीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यास असमर्थता व्यक्त केल्यामुळे त्याचे नाव एकदिवसीय संघातून हटविण्यात आले आहे. निवड समितीने त्याच्या जागी वेगवन गोलंदाज आकाशदीपला निवडले असल्याचे बीसीसीआयच्या निवेदनात म्हटले आहे.









