दोड्डहोसूर येथीली घटना : दुचाकी जळून खाक
खानापूर : खानापूर तालुक्यातील दोड्डहोसूर येथील रस्त्यावर पडलेल्या विद्युत वाहिन्यावरून दुचाकी गेल्याने एक युवक विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दोड्डहोसूर येथे दुपारी घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दोड्डहोसूर येथील सागर नारायण पाटील (वय 32) यांची यडोगा रस्त्यावर शेती आहे. या ठिकाणी जनावरांसाठी लागणारा चारा ते करतात. चारा कापून टॅक्टरमधून घराकडे पाठविला. त्यानंतर मुख्य रस्त्यावरून ते आपल्या घरी परतत होते. रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युतभारित तारेवरून त्यांची दुचाकी गेल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. त्यात ते दुचाकीवरून उडून लांब फेकले गेल्याने बेशुद्ध पडले. त्यांची दुचाकी विद्युतभारित तारेवर पडल्याने दुचाकीने पेट घेतला. काही वेळानंतर ते शुद्धीवर आल्यावर त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला विजेचा जबर धक्का बसल्याने जागेवरून हलता येत नव्हते. त्यांनी आपले मित्र महादेव देसाई यांना मोबाईलवरून संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. महादेव देसाई यांनी हेस्कॉम कार्यालयाला माहिती देऊन विद्युत प्रवाह खंडित करण्यास सांगितले. त्यानंतर महादेव यांनी गावातील काही लोकांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. सागर यांना उपचारासाठी खानापूर सरकारी दवाखान्यात आणण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.









