राज्य दलित संघर्ष समितीची आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : रायबाग तालुक्यातील चिंचली गावामध्ये दलित महिलेची फसवणूक करणाऱ्या दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे. चिंचली (ता. रायबाग) येथील दलित महिला शोभा माने यांनी आपली 5 एकर 21 गुंठे जमीन चिंचली येथील राजू भोपाल बनगे यांना 85 लाखाला विकली आहे. मात्र, राजू बनगे सदर जमिनीची रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागला आहे. शैला पाटील आणि बँक मॅनेजर सुरेश भेंडे यांना हाताशी धरून फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून दलित महिलेला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शोभा माने यांना पैसे देण्याऐवजी जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. याबाबत कुडची पोलीस देखील दुर्लक्ष करत आहेत. आरोपींना ताबडतोब समोर आणून या प्रकरणाचा विशेष तपास करावा आणि सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा करावी, याबाबत कार्यवाही करण्यात दिरंगाई झाल्यास अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळेपर्यंत बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा देखील कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीतर्फे देण्यात आला आहे.









