राजहंसगड गावातून जाणाऱ्या बसेस न थांबताच जात असल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर
वार्ताहर /धामणे
राजहंसगड गावातून जाणाऱ्या बसेस न थांबताच जात असल्याने राजहंसगड गावच्या शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना समस्या होत असल्याने शुक्रवार दि. 15 रोजी राजहंसगड गावातील विद्यार्थी व पालकांनी चार बसेस तीन तास अडवून रास्ता रोको केला. राजहंसगड गाव हे देसूर व नंदिहळ्ळी रस्त्यावर असल्याने या गावाला स्वतंत्र बसची सेवा नाही. त्यामुळे बेळगाव शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना नंदिहळ्ळी व गर्लगुंजी बसमधून ये-जा करावी लागते. परंतु सकाळी शाळेच्या वेळेत नंदिहळ्ळीहून येणाऱ्या बस भरून येत असल्याने राजहंसगड गावात न थांबताच जात आहेत. त्यामुळे शाळा, कॉलेज विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी शाळा सुटल्यानंतरही बसमध्ये गर्दी होऊन जागा न मिळाल्यामुळे पुन्हा दुसरी बस नाही.
देसूरच्या बसने गेल्यास देसूर गावाहून राजहंसगड गावापर्यंत तीन कि.मी. अंतर चालत जावे लागते, असे येथे उपस्थित विद्यार्थ्यांनी सांगितले. गावकऱ्यांकडून बसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गेल्या सहा महिन्यापूर्वीपासून पाच ते सहावेळा गावकरी आणि विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेच्या वेळेत व शाळा सुटण्याच्या वेळेत जादा एक बस सोडा, या मागणीचे निवेदन दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. परंतु परिवहनचे अधिकारी याकडे कानाडोळा करत आहेत. संध्याकाळी शाळेहून येतेवेळी बस मिळाली नाहीतर शाळेला गेलेल्या विद्यार्थ्यांना एका व्यक्तीने मच्छे, उद्यमबाग, टिळकवाडीपर्यंत जाऊन विद्यार्थ्यांना आणावे लागत असल्याचे येथील पालकांकडून सांगण्यात आले. यामुळे आज आम्ही गावातील विद्यार्थी व पालकांच्यावतीने गावातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या बसेस अडवून धरल्या. कारण परिवहनचे वरिष्ठ अधिकारी येथे येवून परिस्थितीची पाहणी केल्याशिवाय त्यांना कळणार नाही.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
या सर्व प्रकारानंतर दोन ते अडीच तासांनी वडगाव ग्रामीण पीएसआय लकाप्पा व त्यांचे सहकारी आणि परिवहनचे अधिकारी राजहंसगड गावात दाखल होऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थी व पालकांशी बस शाळेच्या वेळेत चर्चा करण्यात येऊन बसच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर थांबलेल्या चारही बस सोडण्यात आल्या. या रास्ता रोको आंदोलनात ग्रा. पं. सदस्य जोतिबा थोरवत, नंदिहळ्ळी ग्रा. पं. सदस्य मल्लिकार्जुन लोकूर, हणमंत नावगेकर, मारुती लोकूर, रामदास जाधव, बसवंत पवार, गुरुदत्त लोखंडे, श्रीकांत तावसे, परशराम अनगोळकर आदी पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.









