जलस्रोत वाढविण्यासाठी रोजगार हमी योजनेचा हातभार लागणार
बेळगाव : यंदा पावसाअभावी भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. यासाठी जिल्हा पंचायत, ग्राम पंचायत पातळीवर आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात जलस्रोत वाढविण्यासाठी रोजगार हमी योजनेचा हातभार लागणार आहे. रोहयो अंतर्गत गटारी, रस्ते, शेततलाव, वृक्षारोपण आदींचा विकास केला जात आहे. त्याबरोबर आता अर्धवट असलेल्या आणि नवीन विहिरींची खोदाई होणार आहे. त्यामुळे पाणीप्रश्न किंचित कमी होणार आहे. मागील काही वर्षात जिल्ह्यात 200 हून अधिक तलावांची खोदाई झाली आहे. काही तलाव डोंगर क्षेत्रात खोदण्यात आले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांनाही हे तलाव आधार ठरू लागले आहेत. यंदा पावसाअभावी अडीच लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. शिवाय येत्या काळात पाण्याअभावी पिके घेणे अडचणीचे ठरणार आहे. अशा परिस्थितीत रोजगार हमी योजनेतून तलावांची निर्मिती केली जाणार आहे. यंदा रोजगार हमी योजनेतील कामे सुरू झाली आहेत. याअंतर्गत तलाव खोदाईला प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्ह्यात पाणी नसलेल्या विहिरी आणि तलावांची खोदाई केली जाणार आहे.
नवीन विहिरी खोदाईला प्राधान्य !
रोजगार हमी योजनेंतर्गत नवीन विहिरी खोदाईला प्राधान्य दिले जाणार आहे. मागील वर्षीदेखील पडीक आणि डोंगर भागात विहीर आणि तलावांची खोदाई झाली आहे. जुन्या विहिरींची खोदाई रोहयोतून होणार नाही. मात्र, नवीन विहीर खोदाई केली जाणार आहे.
हर्षल भोयर (जि. पं. सीईओ)









