वृत्तसंस्था/ राजकोट
2023 च्या क्रिकेट हंगामातील सुरू असलेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत दीपक हुडाच्या कप्तानी खेळीच्या जोरावर राजस्थानने उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटकाचा 6 गड्यांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता राजस्थान आणि हरियाणा यांच्यात जेतेपदासाठी शनिवारी सामना होणार आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकाने 50 षटकात 8 बाद 282 धावा जमवित राजस्थानला विजयासाठी 283 धावांचे आव्हान दिले. पण कर्णधार दीपक हुडाच्या कप्तानी खेळीने झळकवलेल्या 180 धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने हा सामना 38 चेंडू बाकी ठेऊन 6 गड्यांनी जिंकला. या स्पर्धेत हरियाणाने तामिळनाडूचा 63 धावांनी पराभव करत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या कर्नाटकाच्या डावात अभिनव मनोहरने 80 चेंडूत 91 धावा तर भडांगेने 39 चेंडूत 63 धावा झळकाविल्या. कर्नाटकाची डावाला चांगली सुरूवात झाली नाही. नवव्या षटकाअखेर त्यांची स्थिती 2 बाद 27 अशी होती. त्यानंतर अभिनव मनोहरने 2 महत्त्वाच्या भागिदाऱ्या करुन संघाचा डाव सावरला. मनोहरने मनिष पांडे समवेत पाचव्या गड्यासाठी 89 धावांची तर भडांगे समवेत सहाव्या गड्यासाठी 95 धावांची भागिदारी केली. मनिष पांडेने 28 धावा केल्या. मनोहरने 80 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 91 धावांची खेळी केली. भडांगेने 5 षटकार आणि 3 चौकारांसह 39 चेंडूत 63 धावा झोडपल्या. राजस्थानतर्फे अंकित चौधरी आणि अजय सिंग यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना राजस्थानच्या डावामध्ये कर्णधार दीपक हुडाने 128 चेंडूत 5 षटकार आणि 19 चौकारांसह 180 धावांची खेळी केली. करण लांबाने 112 चेंडूत नाबाद 73 धावा झळकाविल्या. हुडा आणि लांबा या जोडीन चौथ्या गड्यासाठी 255 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी राजस्थानची एकवेळ स्थिती 3 बाद 23 अशी केविलवाणी होती. कर्नाटकातर्फे कौशिक, विशाख आणि भांडगे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : कर्नाटक 50 षटकात 8 बाद 282 (अभिनव मनोहर 91, भांडगे 63, मनिष पांडे 28, अंकित चौधरी, अजय सिंग प्रत्येकी 2 बळी), राजस्थान 44.4 षटकात 4 बाद 283 (दीपक हुडा 180, करण लांबा नाबाद 73, कौशिक, विशाख, भांडगे प्रत्येकी 1 बळी).









