वृत्तसंस्था/ सेंट जॉर्ज
इंग्लंड आणि यजमान विंडीज यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत विंडीजने गुरूवारच्या सामन्यात विजय नोंदविला. या मालिकेतील झालेल्या दुसऱ्या सामन्यात विंडीजने इंग्लंडचा 10 धावांनी पराभव केला. विंडीजच्या ब्रँडन किंगला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेतील पहिला सामना विंडीजने जिंकून विजयी सलामी दिली होती. गुरूवारच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकात 7 बाद 176 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 20 षटकात 7 बाद 166 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 10 धावांनी गमवावा लागला.
विंडीजच्या डावामध्ये सलामीच्या ब्रँडन किंगने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहत 52 चेंडूत 5 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी केली. मेयर्सने 16 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17 धावा जमविताना किंग समवेत सलामीच्या गड्यासाठी 34 चेंडूत 43 धावांची भागिदारी केली. पूरनने 5, शाय हॉपने 1, हेटमेयरने 2 धावा जमविल्या. किंग आणि कर्णधार पॉवेल यांनी पाचव्या गड्यासाठी 80 धावांची भागिदारी केली. पॉवेलने 28 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह 50 धावा जमविल्या. रसेलने 10 चेंडूत 2 षटकारांसह 14 धावा केल्या. विंडीजच्या डावात 13 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे आदिल रशिद आणि मिल्स यांनी प्रत्येकी 2 तर वोक्स, सॅम करण व रेहान अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये सॅम करनने 32 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 50, सॉल्टने 23 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25, जॅक्सने 21 चेंडूत 4 चौकारांसह 24, मोईन अलीने 13 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 22, लिव्हिंगस्टोनने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 9 चेंडूत 17, कर्णधार बटलरने 1 चौकारासह 5, ब्रूकने 5 तर वोक्सने 2 धावा जमविल्या. रेहान अहमदने 3 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 10 धावा केल्या. इंग्लंडच्या डावात 7 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे जोसेफने 39 धावात 3 तर अकिल हुसेनने 24 धावात 2, होल्डर आणि मोती यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील गुरुवारी खेळविण्यात आलेला हा दुसरा टी-20 सामना महत्त्वाच्या घटनेने ऐतिहासिक म्हणावा लागले. या सामन्यात पहिल्यांदाच महिला पंच मैदानावर उपस्थित झाली होती. या सामन्यासाठी विंडीजच्या जॅक्वेलिनी विलियम्सने मैदानावरील पंच म्हणून चोख कामगिरी पार पाडली.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 20 षटकात 7 बाद 176 (किंग 5 षटकार, 8 चौकारांसह 52 चेंडूत नाबाद 82, पॉवेल 5 षटकार, 3 चौकारांसह 28 चेंडूत 50, मेयर्स 17, रसेल 14, आदिल रशिद आणि मिल्स प्रत्येकी 2 बळी, मोईन अली, वोक्स, रेहान अहमद प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 20 षटकात 7 बाद 166 (सॅम करण 32 चेंडूत 3 षटकार, 4 चौकारांसह 50, सॉल्ट 25, जॅक्स 24, मोईन अली नाबाद 22, लिव्हिंगस्टोन 17, रेहान अहमद नाबाद 10, अवांतर 6, जोसेफ 3-39, अकिल हुसेन 2-24, होल्डर 1-27, मोती 1-9).









