पटियाला हाऊस कोर्टाचा आदेश,
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा घुसखोरी प्रकरणातील मास्टरमाईंड ललित झा याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. गुरुवारी रात्री उशिराने त्याने दिल्ली पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. शरणागतीपूर्वी पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने चारही साथीदारांचे फोन जाळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर आता संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील मास्टरमाईंड ललित झा याला पटियाला हाऊस न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकील उमाकांत कटारिया यांनी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्यावतीने युक्तिवाद केला. ललित झा या घटनेचा सूत्रधार असल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन या कटामागे किती लोक आहेत याचा शोध घ्यावा लागेल, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. यावेळी ललित झा याच्यासाठी 15 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र सध्या न्यायालयाने सात दिवसांची कोठडी मंजूर केली आहे.
चौकशीत नवे खुलासे उघड
संसदेच्या सुरक्षेतील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींना अटक झाल्यापासून एकापाठोपाठ एक नवीन खुलासे होत आहेत. लोकसभेत घुसखोरीचा त्यांचा मुख्य प्लॅन फसला, तर त्याच्याकडे प्लॅन ‘बी’ तयार होता, असे ललितने पोलिसांना सांगितले. काही कारणास्तव प्लॅन ए नुसार, नीलम आणि अमोल यांना संसद भवनाजवळ जायचे होते, जर ते त्यात अयशस्वी झाले तर महेश आणि कैलाश दुसऱ्या बाजूने संसदेकडे जातील आणि नंतर संसदेसमोर स्मोक बॉम्ब फोडून घोषणाबाजी करतील असे ठरविण्यात आल्याचे झा याने सांगितले. गुऊग्राममध्ये संपूर्ण ग्रुप मेंबर्स राहत असलेल्या ठिकाणी म्हणजेच विशाल शर्मा उर्फ विक्कीच्या घरी महेश आणि कैलाश पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे अमोल आणि नीलम यांना संसदेबाहेरील कामकाज कोणत्याही किमतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
आतापर्यंत 9 जणांना अटक
पूर्वनियोजनाप्रमाणे सुरक्षा भेदणाऱ्या युवकांच्या संपूर्ण गटाने ‘प्लान ए’ यशस्वी केला. या घटनेनंतर ललितने लपण्याचा कटही रचला होता. या योजनेनुसार ललितला राजस्थानमध्ये अज्ञातवासात जाण्यास मदत करण्याची जबाबदारी महेशवर देण्यात आली होती. महेशने त्याचे ओळखपत्र वापरून ललितच्या गेस्ट हाऊसमधील राहण्याची व्यवस्था पूर्ण केली होती. मात्र, ललित आणि महेश यांनी गुऊवारी रात्री दिल्लीतील पोलीस स्थानक गाठून आत्मसमर्पण केले. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सागर शर्मा, मनोरंजन डी, नीलम आझाद, विकी आणि विकीची पत्नी, महेश, कैलाश, ललित झा आणि अमोल शर्मा यांचा समावेश आहे.









