नवी दिल्ली:
संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे स्वीकारल्याच्या प्रकरणी तृणमूल नेत्या महुआ मोइत्रा यांना 8 डिसेंबर रोजी संसद सदस्यत्व गमवावे लागले होते. महुआ यांनी या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी सध्या टळली असून ती आता 3 जानेवारीला होणार आहे. न्यायाधीश संजीव खन्ना आणि एस.व्ही.एन. भट्टी यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी झाली. महुआ यांच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली आहे. लोकसभेतून बडतर्फ मोइत्रा यांना लवकरच शासकीय निवासस्थान सोडावे लागू शकते. संसदेच्या हाउसिंग कमिटीने केंद्रीय आवास मंत्रालयाला मंगळवारी पत्र लिहून महुआ यांना शासकीय बंगला रिकामी करविण्याचा आदेश देण्याची सूचना केली होती.









