वृत्तसंस्था /पॅरिस
2023 च्या टेनिस हंगामात पोलंडची टॉप सिडेड महिला टेनिसपटू इगा स्वायटेकची सर्वोत्तम महिला टेनिसपटू म्हणून निवड केली आहे. डब्ल्यूटीएच्या नियंत्रण मंडळाने ही अधिकृत घोषणा केली आहे. पोलंडच्या स्वायटेकने सलग दुसऱ्यांदा हा बहुमान मिळविला आहे. स्वायटेकने चालू वर्षीच्या टेनिस हंगामात तिसऱ्यांदा फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली असून तिने आतापर्यंत 4 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. तसेच गेल्या महिन्यात तिने डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेचे जेतेपद त्याचप्रमाणे महिला टेनिसपटूंच्या वर्षअखेरीस मानांकनातील अग्रस्थान राखले आहे. चालू वर्षीच्या हंगामात 22 वर्षीय स्वायटेकने एकूण 6 स्पर्धा जिंकल्या आहेत.









