अन्नपदार्थांच्या किमती वाढल्याने दर 0.26 टक्क्यांवर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने नोव्हेंबरमध्ये भारतातील घाऊक महागाई दर वाढला आहे. अन्नधान्य महागाई 1.07 टक्क्यांवरून 4.69 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. वाणिज्य मंत्रालयाने 14 डिसेंबर रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील घाऊक महागाई मार्च 2023 नंतर प्रथमच नकारात्मक क्षेत्रातून बाहेर पडली. घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) नोव्हेंबरमध्ये 0.26 टक्क्मयांपर्यंत वाढला आहे. हा दर ऑक्टोबर 2023 मध्ये -0.52 टक्के होता. त्यात आता वाढ होऊन 0.26 टक्के झाला. मागील वर्षी म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये हा दर 6.12 टक्के होता. नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई दराने आठ महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. दुसरीकडे किरकोळ चलनवाढ नोव्हेंबरमध्ये 5.55 टक्क्मयांच्या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. जुलैमधील 7.44 टक्क्मयांच्या 15 महिन्यांच्या उच्चांकापेक्षा हे प्रमाण अजूनही 189 बेसिस पॉईंटने कमी आहे. याच कालावधीत घाऊक महागाई 149 आधार अंकांनी वाढली आहे. खाद्यपदार्थ, खनिजे, यंत्रसामग्री आणि उपकरणे, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑप्टिकल उत्पादने, मोटार वाहनांसह अन्य काही उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम घाऊक महागाई निर्देशांकावर झालेला दिसून येत आहे.
अन्नधान्य महागाई दरात वाढ
ऑक्टोबरच्या तुलनेत अन्नधान्य महागाई 1.07 टक्क्यांवरून 4.69 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा महागाई दर 1.82 टक्क्यांवरून 4.76 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. इंधन आणि विजेचा घाऊक महागाई दर -2.47 टक्क्यांवरून -4.61 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. तर, उत्पादित उत्पादनांचा महागाई दर -1.13 टक्क्यांवरून -0.64 पर्यंत वाढला आहे. यापूर्वी सरकारने 12 डिसेंबर रोजी किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली होती. तीन महिन्यांच्या घसरणीनंतर भारताची किरकोळ महागाई नोव्हेंबरमध्ये 5.55 टक्के झाली आहे. भाजीपाला आणि फळांचे चढे भाव हे त्याचे कारण आहे. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई 4.87 टक्क्यांवर होती. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये कांद्याचे दर 58 टक्क्यांनी, टोमॅटोचे दर 35 टक्क्यांनी, तर बटाट्याच्या दरात 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.









