वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अर्थक्षेत्र हे क्लिष्ट आणि समजण्यास अवघड मानले जाण्याची प्रथा आहे. त्यामुळे टीव्ही वाहिन्यांवर जे आर्थिक किंवा गुंतवणूकविषयक कार्यक्रम किंवा चर्चासत्रे होतात, त्यांच्याकडे सर्वसामान्य लोक दुर्लक्ष करतात. असे कार्यक्रम केवळ त्या क्षेत्राशी संबंधित लोक, शेअरबाजारात नेहमी गुंतवणूक करणारे लोक किंवा आर्थिक क्षेत्रातील तज्ञ यांच्यामध्येच लोकप्रिय असतात. तसेच, अशा कार्यक्रमाचे स्वरुप गंभीर आणि हास्यहीन असते, अशी समजूत आहे. तथापि, काहीवेळा अशा कार्यक्रमांमध्येही उत्स्फूर्त अशी विनोदनिर्मिती होते. असाच एक प्रसंग नुकताच घडला आहे. आर्थिक क्षेत्राला वाहिलेल्या एका प्रसिद्ध वाहिनीवर गुंतवणूकविषयक चर्चा केली जात होती. कोणत्या कंपन्यांचे समभाग विकत घेतल्यास आणि ते किती काळ आपल्यापाशी ठेवल्यास अधिक लाभ होईल, यावर या चर्चेत भाग घेणारे तज्ञ त्यांची मते आणि अनुभव व्यक्त करीत होते. चर्चेत एका गुंतवणूकदाराने आपण एका विशिष्ट कंपनीचे काही समभाग विकत घेतले आहेत, अशी माहिती दिली. यावर, आपण किती काळ हे समभाग आपल्यापाशी ठेवणार आहात आणि ते केव्हा विक्रीला काढण्याची आपली योजना आहे, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर त्याने, राहुल गांधी जेव्हा पंतप्रधान होतील, तेव्हा आपण हे समभाग विक्रीला काढणार आहोत, असे मजेशीर उत्तर दिले. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ‘याचा अर्थ हे समभाग आपण या पुढची बरीच वर्षे स्वत:जवळ ठेवणार आहात असा होतो’ अशी टिप्पणी एका उपस्थिताने केली. यावर अधिकच हशा पिकला. आता, या व्यक्तीला हे समभाग किती काळ स्वत:कडे ठेवावे लागणार हे आगामी लोकसभेच्या निवणुकीचा परिणाम समोर आल्यानंतरच ठरणार आहे. तो पर्यंत सर्वांनी प्रतीक्षा करणे भाग आहे.









