वृत्तसंस्था /अलाहाबाद
मथुरा येथील कृष्णजन्मभूमी स्थानाच्या सविस्तर सर्वेक्षणास अलाहाबाद उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. हे सर्वेक्षण न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्ताकडून केले जावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. मथुरेतील कृष्णजन्मभूमी स्थानाच्या नजीक मुस्लीमांचा इदगाह आहे. या इदगाहाचेही सर्वेक्षण केले जाणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात या सर्वेक्षणासंबंधीची याचिका कृष्णजन्मभूमी स्थानातील देवता ‘भगवान श्रीकृष्ण विराजमान’ यांच्यावतीने विधिज्ञ हरिशंकर जैन, विधिज्ञ विष्णू शंकर जैन, विधिज्ञ प्रभाकर पांडे आणि विधिज्ञ देवकी नंदन यांनी सादर केली होती. हे इदगाह मैदान श्रीकृष्णजन्मभूमी देवस्थानाचाच एक भाग आहे. येथे असणाऱ्या मशिदीच्या तळाशी खरी कृष्णजन्मभूमी आहे. ही कृष्णजन्मभूमीच आहे, हे दर्शविणारी अनेक चिन्हे येथे अद्यापही दिसून येतात. त्यामुळे या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण न्यायालयनियुक्त प्रतिनिधीच्या अधिपत्यात करण्यात यावे, असे प्रतिपादन या याचिकेत करण्यात आले होते.
हिंदूधर्मियांची अनेक चिन्हे
इदगाह परिसरात कमळाची चिन्हे असलेले स्तंभ, शेषनागाची कोरलेली प्रतिमा इत्यादी हिंदू चिन्हे ठळकपणे दिसून येतात. अशी धार्मिक चिन्हे मुस्लीमांची असू शकत नाहीत. त्यामुळे मशीद आणि इदगाह स्थापनेपूर्वी या स्थानी काय होते, हे निर्धारित करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून, न्यायालयनियुक्त प्रतिनिधीकडून सर्वेक्षण होणे आवश्यक आहे, अशी भूमिका मांडण्यात आली होती.
मुस्लीम बाजूचा विरोध
मुस्लीम बाजूने या संपूर्ण परिसराच्या सर्वेक्षणाला विरोध केला होता. यातून काहीही साध्य होणार नाही असे या बाजूचे म्हणणे होते. मात्र, हिंदू पक्षकारांच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण परिसराचे ऐतिहासिक सत्य समोर येणे आवश्यक आहे. त्याशिवाय हे स्थान नेमके कोणाचे, याचा निर्णय करणे शक्य होणार नाही. उच्च न्यायालयाने हे म्हणणे मान्य करुन सर्वेक्षणास अनुमती दिली आहे.









