वार्ताहर /दड्डी
येथील दड्डी-राजगोळी बंधाऱ्यावरील रस्ता पूर्णपणे उखडला असून खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. या रस्त्यावऊन वाहने हाकताना चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत होता. रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेची माहिती ‘तरुण भारत’ने आपल्या अंकात सविस्तर प्रसिद्ध केल्यामुळे या वृत्ताची दखल घेत ओलम साखर कारखान्याने तातडीने या रस्ताकामाला सुरुवात केली आहे. यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गळीत हंगाम सुरू झाल्यामुळे ओलम साखर कारखान्याकडे या भागातील मोठ्या प्रमाणात उसाची आवक सुरू आहे. पण पुलावरील रस्ता खड्डेमय असल्यामुळे ऊस वाहतूक करताना येणाऱ्या अडचणी व दड्डी-राजगोळी भागातील ग्रामस्थांना ये-जा करणे गैरसोयीचे झाले होते. या समस्येचे दुष्परिणाम होऊन याची दखल घेत तातडीने पुलावरील डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ओलम साखर कारखान्याचे नागरिकांतून कौतुक केले जात आहे.









