वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुहेरीतील जागतिक क्रमवारीत एक वेळ अव्वल क्रमांकावर राहिलेला लिएंडर पेस आणि भारताचे माजी टेनिसपटू, ब्रॉडकास्टर तसेच प्रवर्तक विजय अमृतराज हे ‘इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट होणारे पहिले आशियाई पुऊष ठरले आहेत. या दोघांशिवाय प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक रिचर्ड इव्हान्स यांचीही टेनिसमधील या सर्वोच्च बहुमानासाठी निवड झाली आहे.
दुहेरी आणि मिश्र दुहेरीत मिळून 18 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळविलेल्या पेसची खेळाडूंच्या श्रेणीमध्ये निवड करण्यात आली आहे, तर अमृतराज आणि ब्रिटनचे इव्हान्स यांचा योगदानकर्त्यांच्या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे, ज्यांचा दर दोन वर्षांनी विचार केला जातो. या श्रेणीत ज्यांनी खेळावर उत्कृष्ट प्रभाव पाडलेला आहे त्यांचा विचार करून समावेश केला जातो. ‘क्लास ऑफ 2024’चा शनिवारी न्यूपोर्ट, ऱ्होड आयलंड येथे ‘इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये अधिकृतपणे समावेश केला जाईल.
पेस, अमृतराज आणि इव्हान्स हे 27 राष्ट्रांमधील 264 दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या ‘एलिट’ गटात सामील होतील. यासह भारत ‘हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान मिळालेले 28 वे राष्ट्र बनणार आहे. ‘माझ्या देशासाठी तीन दशकांहून अधिक काळ खेळणे हा माझ्या आयुष्याचा सन्मान आहे, ज्याने मला सर्व काही दिले आणि शिकवले. ही पावती खरोखरच प्रत्येक टेनिसपटूसाठी अंतिम प्रशंसा आहे. ‘इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये केवळ मलाच नाही, तर अब्जावधी भारतीयांना स्थान मिळालेले आहे, अस पेस आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला.









