वृत्तसंस्था/ नवी मुंबई
‘टी-20’मध्ये अथक प्रयत्न केल्यानंतर आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ कसोटीकडे वळणार असून भारत व इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना आज गुरुवारपासून चार दिवस येथे चालणार आहे. या प्रकारात निश्चितच त्यांचे पारडे जड आहे आणि हे वर्चस्व राखण्याच्या दृष्टीने अनुभवी फिरकी मारा हे त्यांचे प्राथमिक शस्त्र असेल.
इतिहासात पाहिल्यास ती आकडेवारी भारताला दिलासा देणारी असून 1986 मध्ये या दोन्ही संघांदरम्यान सामने सुरू झाल्यापासून त्यांनी इंग्लंडविऊद्ध 14 सामन्यांमध्ये फक्त एकच कसोटी गमावली आहे. प्रथमच कसोटीत भारताचे नेतृत्व सांभाळणारी हरमनप्रीतही ही अभिमानास्पद कामगिरी अबाधित ठेवण्यास उत्सुक असेल. हिथर नाइटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडविरुद्ध भारतीय महिलांचा शेवटचा कसोटी सामना जून, 2021 मध्ये ब्रिस्टल येथे झाला होता आणि तो अनिर्णित राहिला होता. त्यात मानधनाने पहिल्या डावात 78 धावा केल्या होत्या, तर तऊण शफाली वर्माने 96 आणि 63 धावा काढताना अव्वल कामगिरी केली होती.
पण आजपासून सुरू होणाऱ्या कसोटीला आणखी महत्त्व आहे. महिलांच्या क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटचा अभाव हा एक बारमाही वादविवादाचा मुद्दा राहिलेला आहे. पण यावेळी भारतीय संघ 10 दिवसांच्या कालावधीत दोन कसोटी सामने खेळणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवरील इंग्लंडविऊद्धच्या लढतीनंतर भारतीयांचा सामना वानखेडे स्टेडियमवर 21 ते 24 डिसेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना सप्टेंबर, 2021 मध्ये झाला होता. त्यांनी कॅरारा येथील ती कसोटी अनिर्णित ठेवली होती आणि त्यात स्मृती मानधना 127 आणि 31 अशा धावसंख्येसह मुख्य वैशिष्ट्या म्हणून उभरली होती.
भारतीय संघाचा भर हा फिरकी माऱ्यावर आहे. त्यात बंगालची डावखुरा फिरकीपटू सायका इशाकचा समावेश झालेला आहे. तिने इंग्लंडविऊद्धच्या ‘टी-20’ मालिकेतील अंतिम सामन्यात तीन बळी घेऊन भारताला दिलासा देणारा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. कर्नाटकची डावखुरी सलामीवीर शुभा सतीश ही सराव सामन्यांमध्ये छाप पाडलेल्या नवीन चेहऱ्यांपैकी एक आहे. फलंदाजांमध्ये, जेमिमा रॉड्रिग्स आणि हरलीन देओल यांना अद्याप कसोटी क्रिकेटचा अनुभव नसला, तरी एक कसोटी खेळलेल्या यास्तिका भाटियाला यष्टिरक्षकाच्या भूमिकेसाठी संमती मिळू शकते. वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरचे संघात पुनरागमन झाले आहे आणि फिरकीमध्ये भारताकडे स्नेह राणा, दीप्ती शर्मा अशा अनुभवी गोलंदाज आहेत. त्यामुळे इशाकला संधी न मिळता राहू शकते.
संघ: भारत-हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देओल, सायका इशाक, रेणुका सिंह, तीतास साधू, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकार.
इंग्लंड-हीदर नाइट (कर्णधार), टॅमी ब्युमाँट, लॉरेन बेल, अॅलिस कॅप्सी, केट क्रॉस, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, बेस हीथ, अॅमी जोन्स, एमा लॅम्ब, नॅट सायव्हर-ब्रंट, डॅनियल व्याट.









