कमलेश चंद्र आयोगाच्या अंमलबजावणीची मागणी
बेळगाव : वेतनवाढ करा, तसेच कमलेश चंद्र आयोगाच्या शिफारसी मान्य करून ग्रामीण डाकसेवकांना सर्व सेवा पुरवा, या मागणीसाठी मंगळवारपासून ग्रामीण डाकसेवकांनी बेमुदत आंदोलन छेडले आहे. बेळगावच्या कॅम्प भागातील मुख्य पोस्ट कार्यालयात विभागातील शेकडो ग्रामीण डाकसेवकांनी एकत्रित येऊन आपल्या मागण्या मांडल्या. या मागण्यांचे निवेदन बेळगाव विभागाचे पोस्ट अधीक्षक विजय वडोणी यांच्याकडे सादर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने कमलेश चंद्र आयोगाच्या शिफारसी मान्य करण्याच्या सूचना केंद्र सरकारला देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. वेतनवाढ नसल्याने ग्रामीण डाकसेवक अतिशय तुटपुंज्या पगारामध्ये काम करत आहेत. पूर्वी केवळ डाक सुविधा होती. परंतु डिजिटलायझेशनमुळे सध्या ग्रामीण डाकसेवक घरबसल्या नागरिकांना सेवा देत आहेत. इंडियन पोस्ट पेमेंट बँकमुळे (आयबीपीएस) गावामध्ये राहून पैसे भरणे व काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. याचबरोबर एईपीएसमुळे आधार नोंदणीद्वारे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पैसे काढता येतात. त्यामुळे ग्रामीण डाकसेवकांवरचा भार वाढला असून त्यांना तितक्याच प्रमाणात वेतन देणे गरजेचे आहे. मंगळवारी सकाळी बेळगाव विभागातील सर्व डाकसेवक आंदोलनासाठी मुख्य पोस्ट कार्यालयात जमा झाले. केंद्र सरकारने देशव्यापी सुरू असलेल्या डाकसेवकांच्या आंदोलनाला प्रतिसाद देऊन कमलेशचंद्र आयोगाच्या शिफारसीनुसार डाकसेवकांना सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बेळगाव, खानापूर, रामदुर्ग, बैलहोंगल परिसरातील ग्रामीण डाकसेवक उपस्थित होते. यावेळी संघटनेचे सदस्य शिवण्णा बाळण्णावर, के. आर. पाटील, एल. आर. कांबळे, आर. आर. चित्रगार, सिद्दप्पा अगसगी, वाय. बी. मेलगे, ए. के. चिटणीस यांच्यासह इतर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील डाकसेवा कोलमडली
मंगळवार सकाळपासून ग्रामीण डाकसेवकांनी कामबंद करून आंदोलनामध्ये सहभाग घेतला. बेळगाव विभागातील 375 ग्रामीण डाकसेवक आंदोलनात सहभागी झाले होते. यामुळे मंगळवारी ग्रामीण भागातील टपाल सेवा पूर्णपणे कोलमडली. पत्रांच्या देवाण-घेवाणीसह आयबीपीएस, एईपीएस, पेन्शन वितरण या सर्व सेवांना ब्रेक लागला. त्यामुळे ग्रामीण डाकसेवकांच्या मागण्या मान्य करून सेवा सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात होती.
निवृत्तीला आलेल्या डाकसेवकांनाही तुटपुंजे वेतन
मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागासह दुर्गम भागांमध्ये डाकसेवक सेवा बजावित आहेत. निवृत्तीला आलेल्या डाकसेवकांनाही अतिशय तुटपुंज्या पगारात काम करावे लागते. शहरी भागातील पोस्टमन इतकेच ग्रामीण डाकसेवक काम करत असल्यामुळे त्यांनाही कमलेश चंद्र आयोगानुसार सर्व सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही पोस्ट विभागाकडे केली आहे.
– रामा आनंदाचे (अध्यक्ष ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक, बेळगाव)









