मळणीसाठी कापून ठेवलेले भात खाऊन केले फस्त : ऊस पिकाचेही नुकसान : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
वार्ताहर /नंदगड
खानापूरपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडनावगा येथील शेतवडीत मंगळवारी दुपारी भरदिवसा हत्तीने मळणी करण्यासाठी एकत्रित ठेवण्यात आलेल्या भातावर ताव मारला. त्यामुळे सुरेश गावडे या शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. झाडनावगा गावाच्या लगत नैर्त्रुत्य दिशेला असलेल्या शेतवडीत मंगळवारी दुपारी हत्ती ओरडू लागला. त्याने तिथे असलेल्या सुरेश गावडे यांच्या भाताचे खाऊन तुडवून नुकसान केले. तेथून काही अंतरावर ग्रामस्थ दुसऱ्या ठिकाणी मळणीची कामे करत होते. त्यांनी या हत्तीला जोराने ओरडून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतू माणसाच्या ओरडण्याला हत्तीने कांही दाद दिली नाही. आसपास असलेले लोक जीवाच्या भीतीने हत्तीजवळ जाण्यास धजावत होते.
शेवटी आपणाला लागेल तेवढे भात खाऊन हत्ती जवळच्या जंगलात निघून गेला. झाडनावगा ग्रामस्थांनी शेतवडीत हत्ती आल्याची माहिती वनखात्याला दिली. हत्तीजवळ कोणीही जाऊ नका, असा इशारा खात्याच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिला. हत्ती गावच्या हद्दीत आल्यामुळे ग्रामस्थांत मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मास्केनट्टी, भुरूणकी, तावरकट्टी भागातील शेतवडीत रोज रात्री हत्तीचा कळप घुसून भात व ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. एक तर या भागातील ऊसतोडणीला परवानगी मिळालेली नाही. तर दुसरीकडे उभ्या पिकावर होत असलेल्या हत्तींचे आक्रमण पाहता शेतकरी वर्ग संतप्त बनला आहे. रोज दुपारी चार वाजल्यापासून पहाटेपर्यंत ऊस पिकाची राखण शेतकऱ्यांना करावी लागत आहे. हत्ती पिकात येऊ नये म्हणून भांडी, डबे व अन्य साहित्य वाजवून आवाज करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी एखाद्या शेतकऱ्यांनी राखण करणे सोडून दिले तर त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान हत्तीकडून हमखास केले जात आहे.









