विधानसौध परिसरात छेडले आंदोलन
बेळगाव : हडपद समाजाचा लिंगायत प्रवर्ग जातीमध्ये समावेश करावा, हडपद अप्पण्णा यांच्या जन्मस्थळाचा विकास साधावा, समाजातील मुलांसाठी बेंगळूर येथे सामुदायिक भवन उभारावे, समाजातील गरीब मुलांसाठी शैक्षणिक आरक्षण द्यावे, शिवाय समाजाच्या विकासासाठी 50 कोटी अनुदान जाहीर करावे, आदी मागण्यांसाठी अखिल कर्नाटक हडपद अप्पण्णा समाज सेवा संघातर्फे विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले आहे. या समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे समाजातील शैक्षणिक व सामाजिक प्रगती खुंटली आहे. हडपद अप्पण्णा यांचे वंशज पारंपरिक व्यवसाय करत असले तरी त्यांना समाजात कमी लेखले जाते. मागील 2-3 वर्षांपासून समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र शासनाकडून दुर्लक्ष होवू लागले आहे. समाजाच्या प्रगतीसाठी अनुदान देण्याबरोबर शिक्षण, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्राधान्य द्यावे. समाजासाठी आमदार, खासदार, ता. पं., जिल्हा पंचायत, राजकीय निवडणुकांमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.









