कित्तूर येथून विधानसौधकडे पदयात्रा
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या महसूल विभागात ग्राम साहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या डी दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शासनाच्या सुविधांविना रहावे लागत आहे. डी ग्रुप कर्मचाऱ्यांना वेतन वाढीसह नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी कर्मचाऱ्यांनी कित्तूर येथून विधानसौधकडे पदयात्रा काढली. शिवाय या मागणीसाठी विधानसौध परिसरात आंदोलन छेडले. मागील 44 वर्षांपासून महसूल विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षापासून वंचित रहावे लागले आहे. शासनाच्या कोणत्याच सुविधा मिळत नसल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. केवळ तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले. यावेळी जिल्हाध्यक्ष महादेवप्पा इंगळगी, मडिवळप्पा व्हन्नूर यांसह कर्मचारी उपस्थित होते.









