30 दिवसांच्या आत बंगला रिकामी करावा लागणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यावरही अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत. मोइत्रा यांना 30 दिवसांत शासकीय निवासस्थान रिकामी करण्यासाठीची नोटीस बजावण्यात आली आहे. संसद सदस्यत्व रद्द झालयावर मोइत्रा यांनी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत निर्णयाला आव्हान दिले आहे. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी एक अधिसूचना जारी करत ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणी तृणमूल खासदार मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती.
मोइत्रा या पश्चिम बंगालच्या कृष्णानगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या. नीतिमत्ता समितीने नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप मोइत्रा यांनी केला होता. नीतिमत्ता समितीचा वापर विरोधी पक्षांना दडपण्यासाठी एक अस्त्र म्हणून केला जात असल्याचा दावा मोइत्रा यांनी केला होता. मोइत्रा यांच्यावर एका व्यावसायिकाला स्वत:चा लॉगइन आयडी पुरविल्याचा आणि त्याच्या मार्फत संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे.









