राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्काराचे वितरण
बेळगाव : समाजात भांडवलशाही एका वेगळ्या टोकाला पोहोचली आहे. काही मोजक्या लोकांच्या हातात भांडवलशाहीची सूत्रे आहेत. त्यामुळे लहान भांडवलदार आणि व्यावसायिक अडचणीत आले आहेत, असे विचार सत्कारमूर्ती कॉ. डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार समिती बेळगाव यांच्यावतीने यंदाचा राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार सांगली येथील कॉ. डॉ. भारत पाटणकर यांना देण्यात आला. यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. व्यासपीठावर अॅड. राजाभाऊ पाटील, प्राचार्य अनंत देसाई, डॉ. मंजुश्री पवार, प्रा. आनंद मेणसे आदी उपस्थित होते. पाटणकर पुढे म्हणाले, फुलेंनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’मध्ये शेतीवर आधारित उद्योग सुरू झाले पाहिजेत, असे पहिल्यांदा म्हटले. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी आधारित उद्योग कसे तयार झाले पाहिजेत? याबाबत प्रशिक्षण दिले पाहिजे. शिवाय शेतीच्या मालावर बेसिक उद्योगही निर्माण झाले पाहिजेत, अशी भूमिका त्या काळी फुलेंनी मांडली होती. यावेळी कॉ. भारत पाटणकर यांना राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 25 हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. प्रारंभी डॉ. मंजुश्री पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. आनंद मेणसे यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. अॅड. राजाभाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षक, रसिक उपस्थित होते. प्रा. सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









