रूमेवाडी क्रॉसपर्यंत रस्ता पूर्णपणे खराब होऊनही अवजड वाहनांची वाहतूक : तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन
वार्ताहर /नंदगड
खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा हा रस्ता गोव्याला जाण्यासाठी कमी अंतराचा असल्याने या रस्त्यावरून सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. यामुळे रूमेवाडी क्रॉस ते खानापूर तालुका हद्दीपर्यंत रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. यामुळे या रस्त्यावरून दळणवळणासाठी दुचाकी व चारचाकीवरून जाता-येताना परिसरातील 30 हून अनेक खेड्यांतील जनतेचे मोठे हाल होत आहेत. हा रस्ता नव्याने करावा यासाठी खानापूर तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सोमवारी निवेदने देण्यात आली.
खानापूर म. ए. समितीचे निवेदन, रास्तारोकोचा इशारा
खानापूर-अनमोड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू केले नसल्यास मणतुर्गा क्रॉस येथे रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, रणजित पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी म. ए. समितीचे नेते प्रकाश चव्हाण, गोपाळ हेब्बाळकर आदींसह अन्य उपस्थित होते.
निवेदनात असे म्हटले आहे की, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 22 ऑगस्ट 2022 रोजी निवेदन देण्यात आले होते. परंतु आजतागायत या रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे या भागातील जनतेला मोठा त्रास सोसावा लागत आहे. हा रस्ता अरुंद असून जंगलातून जात असल्यामुळे केवळ हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी व या भागातील जनतेसाठी उपयोगात यावा, असा वरिष्ठांचा आदेश असताना काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गोव्याला जाणारी अवजड वाहतूकही या रस्त्यावरून सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून या भागातील लोकांना या रस्त्यावरून साधी दुचाकी चालवणेसुद्धा कठीण झाले आहे. वारंवार छोट्या मोठ्या अपघातांची मालिका येथे सुरू असते. त्यामुळे या रस्त्यावरची अवजड वाहतूक थांबवावी. व लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. उपतहसीलदार कोलकार यांनी याबाबतचे निवेदन स्वीकारले.
खानापूर-अनमोड रस्त्याचा वापर करणाऱ्या हेम्माडगा परिसरातील मणतुर्गा, शिरोली, नेरसा ग्रामपंचायत क्षेत्रातील समस्त जनतेच्यावतीने रस्ता दुरुस्तीसंदर्भात सोमवारी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बोबाटे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी खानापूर को-ऑप. बँकेचे चेअरमन अमृत शेलार, ता. पं. माजी सदस्य अशोक देसाई, खानापूर तालुका ग्रा. पं. संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, मणतुर्गा ग्रा. पं. अध्यक्ष सुरेश सुळकर, मारुती देवलकर, मऱ्याप्पा पाटील आदींसह विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेम्माडगा रस्त्याची दुरुस्ती त्वरित न झाल्यास 26 रोजी रास्तारोको
निवेदनात म्हटले आहे की, खानापूर-हेम्माडगा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा ठरत आहे. अनेक वाहने व ट्रॅक्टर पलटी होत आहेत. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. अनेक विद्यार्थी बस व दुचाकीने प्रवास करतात. धोकादायक रस्त्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. वृद्धाना व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याकरिता या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा 26 डिसेंबर रोजी रास्तारोको करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ग्रेड वन तहसीलदार बुवा यांनी हे निवेदन स्वीकारले.









