वृत्तसंस्था/ गकेबरहा (दक्षिण आफ्रिका)
भारताचा दक्षिण आफ्रिकेविऊद्धचा दुसरा टी-20 सामना आज मंगळवारी होणार असून यावेळी हवामान चांगले राहण्याची आशा त्यांना असेल. मालिकेतील सलामीचा सामना पावसात वाहून गेल्याने भारतीय युवा खेळाडूंना एका लढतीवर पाणी सोडावे लागले. रविवारी डर्बनमध्ये नाणेफेकही होऊ शकली नाही आणि तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यावेळी पाऊस हजेरी लावू शकतो असा अंदाज आहे. आता जूनमध्ये होणाऱ्या ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताला फक्त पाच सामने खेळण्यास मिळणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना आजमावून पाहण्यासाठी व्यवस्थापनाला फारशी संधी मिळणार नाही.
सध्याच्या परिस्थितीत ‘आयपीएल’मधील फॉर्मला अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेशात होणार असलेल्या विश्वचषक स्पर्धेकरिता भारतीय संघ निवडताना खूप महत्त्व येईल. निवड समितीने दक्षिण आफ्रिकेतील मालिकेसाठी 17 जणांचा संघ निवडलेला असून उर्वरित दोन सामन्यांमध्ये या सर्वांना संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. शुभमन गिल हा विश्वचषकानंतर झालेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या ‘टी-20’ मालिकेचा भाग नव्हता. असे असले, तरी तो, सूर्यकुमार यादव व रिंकू सिंग यांची सहा महिन्यांनंतर होणार असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी निवड निश्चित आहे.
यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनीही धावा केलेल्या आहेत पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विश्वचषकासाठी स्वत:ला उपलब्ध केल्यास या दोन खेळाडूंना संघात स्थान मिळविण्यासाठी ‘आयपीएल’मधून जोरदार प्रयत्न करावे लागतील. विश्वचषकापूर्वी भारताची दुसरी मालिका पुढील महिन्यात मायदेशात अफगाणिस्तानविऊद्ध होणार आहे. त्यामुळे निवड समितीला विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडताना केवळ आयपीएलमधील कामगिरीचा विचार करणे भाग पडेल. यामुळे विश्वचषक स्पर्धेपूर्वीच्या भारताच्या ‘टी-20’ वेळापत्रकासंबंधीही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रिंकूप्रमाणेच जितेश शर्माकडेही ‘टी-20’मधील फिनिशर म्हणून पाहिले जात आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्ध चांगली कामगिरी केल्याने जितेशला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळण्याची आशा असेल. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर चेंडू जास्तच उसळतो. त्यामुळे युवा फलंदाजांचा खूप कस लागेल. गोलंदाजीच्या विभागातील केवळ अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांची विश्वचषकासाठीच्या संघातील निवड पक्की आहे. त्यामुळे काही जागा खुल्या आहेत. बुमराह या मालिकेत खेळत नाही. दीपक चहरला या मालिकेसाठी निवडण्यात आले होते, पण तो वैयक्तिक कारणास्त भारतातच राहिला आहे.
कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई, ज्याने ऑस्ट्रेलियाविऊद्ध टी-20 मध्ये छाप पाडली होती, या दोन फिरकीपटूंना या मालिकेत आपला चांगला फॉर्म दाखविण्याची संधी आहे. विश्वचषकानंतर ब्रेक घेतलेला रवींद्र जडेजाही संघात सामील झाला आहे. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेकडेही विश्वचषक स्पर्धेपूर्वी खेळाडूंना आजमावून पाहण्यासाठी केवळ पाच सामने आहेत. मार्को जॅनसेन आणि जेराल्ड कोएत्झी या वेगवान गोलंदाजी करणाऱ्या जोडीला फक्त पहिल्या दोन सामन्यांसाठी निवडले गेले आहे. सलामीचा सामना वाहून गेल्याने कसोटीवर लक्ष केंद्रीत करण्यापूर्वी त्यांना फक्त एकच ‘टी-20’ लढत मिळेल.
संघ-भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
दक्षिण आफ्रिका-एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रीत्झ्के, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, केशव महाराज, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाद विल्यम्स.









