काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा केला निषेध
कणकवली / प्रतिनिधी
झारखंडचे काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात २०० कोटींहून अधिक बेहिशोबी मालमत्ता सापडली. जिथे जिथे कॉंग्रेसचे सरकार असते तिथे कॉंग्रेस सरकारच्या माध्यमातून राज्याची व जनतेची लूट करतात. खासदार साहू हे याचेच उदाहरण आहे. अशा भ्रष्टाचारी कॉंग्रेसचा निषेध करत भाजपा महिला मोर्चाच्या नेतृत्वाखाली खासदार साहू यांच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन छेडत पुतळा जाळण्यात आला.
येथील केंद्रीय मंत्री नारायण राणे कार्यालयासमोर हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला उपाध्यक्षा प्रज्ञा ढवण, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष नामदेव जाधव, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, महिला शहर अध्यक्ष प्राची कर्पे, जिल्हा कार्यकारणी सदस्या मेघा गांगण, भाग्यलक्ष्मी साटम, सोशल मिडीया प्रमुख समीर प्रभूगांवकर, कळसुली सरपंच सचिन पारधिये, सुभाष मालंडकर आदी उपस्थित होते.
अनेक बेकायदेशीर व्यवसाय असलेले धीरज साहू हे काँग्रेसचे तीन वेळेचे खासदार राहिलेले आहेत. भ्रष्टाचार हा काँग्रेसचा गुणधर्म आहे. नुकत्याच झालेल्या राज्यांच्या निवडणूकात जनतेने काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळून भाजपाचे सरकार निवडून दिले. झारखंडमधील या २०० कोटीच्या प्रकरणामुळे कॉंग्रेसमध्ये सुधारणा झालेली नाही, हे दिसून येते. राज्यातही अडीज वर्षांचा कारभार पाहता त्यांचे सरकार असताना गृहमंत्री १०० कोटींचे हप्ते मागत होते. यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करण्यात येत होता. हीच काँग्रेसच्या राजकरणाची पद्धत राहिली आहे. काँग्रेसचा हात देशाला लुबाडणारा असल्याचा आरोप करत यावेळी खासदार साहू यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. मात्र, पोलिसांनी पुतळा काढून घेतला.