शाय होप ‘मालिकावीर’, मॅथ्यू फोर्ड ‘सामनावीर’, कार्टीचे अर्धशतक, बेन डकेटचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
केसी कार्टीचे समयोचित अर्धशतक तसेच शेफर्डच्या 41 धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान विंडीजने शनिवारी येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडचा 14 चेंडू बाकी ठेऊन 4 गड्यांनी पराभव केला. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत विंडीजने 2-1 अशा फरकाने इंग्लंडवर मात केली. कर्णधार शाय हॉपला मालिकावीर तर वनडे क्रिकेटमध्ये पर्दापण करणाऱ्या मॅथ्यू फोर्डला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. गेल्या 25 वर्षांत वेंडीजने इंग्लंडवर मिळविलेला हा पहिलाच मालिकाविजय आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीजने इंग्लंडचा 4 गड्यांनी पराभव करुन आघाडी मिळविली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विंडीजवर 6 गड्यांनी विजय मिळवित मालिकेत बरोबरी साधली होती. शनिवारचा तिसरा आणि निर्णायक सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. सामना सुरू होण्यापूर्वी येथे जवळपास 2 तास पावसाने झोडपल्याने हा सामना 40 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान विंडीजचा डाव सुरू होण्यापूर्वी पुन्हा पावसाचे आगमण झाल्याने पंचांनी आणखी 6 षटके कमी करत विंडीजला 34 षटकांचे उद्दिष्ट दिले होते. आणि त्यांना 34 षटकात 188 धावा विजयासाठी करणे गरजेचे होते. विंडीजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 40 षटकात 9 बाद 206 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 31.4 षटकात 6 बाद 191 धावा जमवित आपला विजय नोंदविला.
या शेवटच्या सामन्यात खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये बेन डकेटने एकाकी लढत देत 73 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 71 धावा झळकाविल्या. लिविंगस्टोनने 56 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 45 धावा जमविल्या. अॅटकिनसनने 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 20, जॅक्सने 2 चौकारांसह 17, सॅम करणने 12 रेहान अहमदने 2 चौकारांसह 15, पॉट्सने 1 चौकारासह नाबाद 15 धावा केल्या. इंग्लंडच्या डावामध्ये 4 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे मॅथ्यू फोर्ड आणि जोसेफ यांनी प्रत्येकी 3 तर शेफर्डने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीचा किंग अॅटकिनसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 1 धाव जमवली. कार्टी आणि अॅथनेज या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 76 धावांची भागिदारी केली. अॅलेक अॅथनेजने 51 चेंडूत 7 चौकारांसह 45 तर कार्टीने 58 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 50 धावा जमविल्या. कर्णधार होपने 1 षटकार आणि 1 चौकारासह 15, हेटमेयरने 1 षटकारासह 12, रुदरफोर्डने 3, शेफर्डने 28 चेंडूत 3 षटकार, 3 चौकारांसह नाबाद 41 तर मॅथ्यू फोर्डने 16 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 13 धावा जमविल्या. शेफर्ड आणि फोर्ड यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. शेफर्ड आणि फोर्ड या जोडीने सातव्या गड्यासाठी अभेद्य 56 धावांची भागिदारी केली. विंडीजच्या डावातील 32 वे षटक लिविंगस्टोनने टाकले. या षटकात त्याने 5 वाईड चेंडू टाकले. शेफर्डने विजयी चौकार ठोकला. विंडीजच्या डावात 6 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्पे जॅक्सने 22 धावात 3, अॅटकिनसनने 58 धावात 2 तर रेहान अहमदने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड 40 षटकात 9 बाद 206 (सॉल्ट 4, जॅक्स 17, क्रॉले 0, डकेट 71, ब्रूक 1, बटलर 0, लिविंगस्टोन 45, सॅम करण 12, रेहान अहमद 15, अॅटकिनसन नाबाद 20, पॉट्स नाबाद 15, अवांतर 6, फोर्ड 3-29, शेफर्ड 2-50, जोसेफ 3-61), विंडीज (विजयासाठी 34 षटकात 188 धावांचे उद्दिष्ट) 31.4 षटकात 6 बाद 191 (अॅथनेज 45, किंग 1, कार्टी 50, होप 15, हेटमेयर 12, रुदरफोर्ड 3, शेफर्ड नाबाद 41, फोर्ड नाबाद 13, अवांतर 11, जॅक्स 3-22, अॅटकिनसन 2-58, रेहान अहमद 1-37).









