राजस्थानातील पराभवावर मंथन : गेहलोत कुठे चुकले हे दिले दाखवून
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थान समवेत हिंदीभाषिक पट्ट्यात झालेल्या पराभवामुळे काँग्रेस पक्ष चिंतेत पडला आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार असल्याने या पराभवामुळे काँग्रेससमोरील आव्हाने वाढली आहेत. याचमुळे राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी पक्षाकडून मंथन सुरू आहे.
राजस्थानातील पराभवानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत देखील सामील झाले. राजस्थानातील पराभवाचे प्रमुख कारण लोकांसोबत योग्यप्रकारे संवाद साधता न येणे असल्याचे राहुल गांधी यांनी बैठकीत सांगितले. तर राज्यात धार्मिक ध्रूवीकरण करविण्यास भाजप यशस्वी ठरल्याने काँग्रेसला पराभव पत्करावा लागल्याचा दावा गेहलोत यांनी केला आहे.
समीक्षा बैठकीत राजस्थानात धार्मिक ध्रूवीकरण झाल्याचा गेहलोतांचा दावा राहुल गांधी यांनी नाकारला आहे. राज्यात धार्मिक ध्रूवीकरण करण्यास भाजप यशस्वी ठरला असता तर काँग्रेसच्या मतांच्या हिस्सेदारीवर याचा प्रभाव दिसून येणे अपेक्षित होते. भाजपला ध्रूवीकरण करण्यास यश मिळाले असते तर काँग्रेसला सुमारे 40 टक्के स्वत:ची मते टिकविता आली नसती. भाजप आणि काँग्रेसमधील विजय-पराभवाचे अंतर अधिक राहिले नसल्याचे राहुल गांधी यांनी बैठकीत म्हटले आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांप्रदायिक राग आळविला. राज्य सरकारच्या कामगिरीला आव्हान देऊन मोदींनी निवडणूक लढविली नसल्याचा युक्तिवाद गेहलोत यांनी बैठकीत केला. तर राज्यात राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजना प्रभावी होत्या या गेहलोत यांच्या दाव्यावर राहुल गांधींनी सहमती दर्शविली.
परंतु राज्य सरकारच्या योजनांना योग्यप्रकारे लोकापर्यंत पोहोचविण्यात आले नाही. दक्षिणेकडील राज्यांमध्ये योजनांना लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले आणि पक्षाचा विजय झाला. योजनांची माहिती लोकांपर्यंत केवळ सभांद्वारे पोहोचविण्यात आली. राज्यात नोकरशाही सरकारपेक्षा अधिक वरचढ ठरली होती असे राहुल गांधी यांचे म्हणणे होते.









