मागील अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित; आश्वासनांची खैरात : अधिवेशनात तरी चर्चा होणार का?
प्रतिनिधी/ बेळगाव
बळ्ळारी नाला हा शेतकऱ्यांना एक शापच ठरला आहे. या नाल्याची खोदाई करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मागील अधिवेशनामध्ये बळ्ळारी नाल्याबाबत चर्चा झाली होती. मात्र सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये अद्याप तरी या नाल्याबाबत चर्चा झाली नाही. त्यामुळे यावर्षीही या नाल्याची खोदाई होणार की नाही? असा प्रश्न बेळगाव परिसरातील जनतेतून उपस्थित होत आहे. अधिवेशनाचे केवळ पाच दिवस शिल्लक आहेत. त्यामध्ये तरी चर्चा होणार की नाही? हे पहावे लागणार आहे.
बळ्ळारी नाल्याला दरवर्षीच पूर येतो. महत्त्वाचे म्हणजे पिकांबरोबरच आता शहरातील काही उपनगरांनाही फटका बसू लागला आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्याची खोदाई आवश्यक आहे. अन्यथा मोठा पाऊस झाल्यास बेळगाव शहरालाही अधिक फटका बसणार आहे. तेव्हा याबाबत गांभीर्य घेण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्dयात बळ्ळारी नाल्याला तीन ते चारवेळा पूर येत असतो. नाल्यामुळे शहापूर, येळ्ळूर, धामणे, वडगाव, अनगोळ शिवारातील पिकांना फटका बसत आहे. बऱ्याचवेळा हातातोंडाला आलेली भातपिकेही वाया जात आहेत. दरवर्षीच शेतकऱ्यांना हा फटका बसत आहे. परिसरातील शेतकऱ्यांना दरवर्षी दोनवेळा भातपेरणी करावी लागत आहे. परतीच्या पावसामुळेही पूर येत असल्यामुळे कडधान्य पेरणीही करणे अवघड जात आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने परिसरातील जमिनीतील भातपिक खराब झाले आहे, तर आता कडधान्य पेरणी करणेही शक्य नसल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. तेव्हा अधिवेशनात यावर चर्चा करून कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
बळ्ळारी नाला पूर्णपणे गाळाने आणि जलपर्णीने भरून गेला आहे. त्यामुळे थोडा पाऊस झाला तरीही नाल्यातील पाणी शिवारांमध्ये जात आहे. आता आनंदनगर परिसरातून सर्वच पाणी थेट बळ्ळारी नाल्याला जात आहे. नाल्याला मोठा पूर येत आहे. बळ्ळारी नाल्याला जोडण्यात येणाऱ्या मोठ्या गटारीही बुजल्या आहेत. त्यामुळेही शिवाराला फटका बसत आहे. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षीच फटका सहन करावा लागत आहे. तरीही प्रशासनाला शेतकऱ्यांची चिंता आणि आत्मियता नसल्यामुळे फक्त पाहणी केल्याचे नाटक वारंवार केले जात आहे. त्यामुळे कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
आनंदनगर ते बळ्ळारी नाल्यापर्यंत मोठ्या गटारींचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर परिसरातील पाणी बळ्ळारी नाल्याला जात असल्यामुळे अधिकच पूर येणार आहे. या मोठ्या गटारी बांधण्यापूर्वी बळ्ळारी नाल्याची खोदाई करणे महत्त्वाचे होते. मात्र बळ्ळारी नाल्याच्या खोदाईकडे दुर्लक्ष करून केवळ येळ्ळूर रस्त्याला लागून असलेल्या एका बाजूच्या गटारीची खोदाई व बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला शिवारामध्ये पाणी साचून राहत आहे. बळ्ळारी नाला खोदाई केल्याशिवाय पाण्याचा निचरा होणे अशक्य आहे. तेव्हा तातडीने बळ्ळारी नाला खोदाईसाठी अधिवेशनात निर्णय घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा पुढील वर्षीही फटका बसणार आहे.
पालकमंत्री लक्ष देणार का?
बळ्ळारी नाल्याकडे लघुपाटबंधारे खाते तसेच जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. माजी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी याची गंभीर दखल घेऊन बळ्ळारी नाला खोदाई करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कामाला गती देणे गरजेचे होते. मात्र अजूनही त्याबाबत पाऊल उचलण्यात आले नाही. सध्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न जनतेतून व शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.









