17-20 डिसेंबर दरम्यान दिल्लीला जाणार
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 17 ते 20 डिसेंबर दरम्यान दिल्लीला जाणार आहेत. याचदरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. राज्यात केंद्र सरकारच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांच्या या भेटीमध्ये केली जाणार आहे. प्रत्येक राज्याला निधी दिला जात असेल तर आम्हाला का नाही? असा प्रश्न त्यांनी यापूर्वीच उपस्थित केला आहे. 17 ते 20 डिसेंबर दरम्यान दिल्लीत इंडिया आघाडीची बैठकही होणार आहे. या बैठकीलाही त्या उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीच्या नियोजनाबाबत आपल्याला कोणीही माहिती दिली नसल्याचा दावा केल्याने बैठक लांबणीवर पडली होती. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनादरम्यान ‘इंडिया’मधील काही निवडक नेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी एकवटले होते. मात्र, या बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी झाल्या नव्हत्या.









