पर्यावरण प्रेमींना भुरळ : विविध कलाकृतींचे आकर्षण : प्रदर्शन उद्यापर्यंत सर्वांना विनामूल्ये खुले
बेळगाव : बागायत खाते, जिल्हा पंचायत, जिल्हा बागायत संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून 64 व्या फल, पुष्प प्रदर्शनाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. क्लब रोड येथील ह्यूमपार्कमध्ये हे प्रदर्शन रविवारपर्यंत चालणार आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते फीत सोडून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर, बागायत खात्याचे सहसंचालक महांतेश मुरगोड यासह मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनात विविध रंगीबेरंगी फुलांची रोपटी, फळे, भाज्या आणि इतर सेंद्रिय उत्पादने ठेवण्यात आली आहेत. विशेषत: फुलांनी आकर्षक कलाकृती साकारण्यात आली आहे. त्यामध्ये कमलबस्ती, वीर राणी कित्तूर चन्नम्मा, घर, राष्ट्र पुरूषांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. त्यामुळे सेल्फीसाठीही नागरिकांची गर्दी होत आहे.
फळांमध्ये राष्ट्रपुरूषांच्या भावमुद्रांचे कोरीव काम
या प्रदर्शनात कलिंगड, भोपळा आणि इतर फळांमध्ये राष्ट्रपुरूषांच्या भावमुद्रांचे कोरीव काम करण्यात आले आहे. त्यामुळे ही फळे देखील आकर्षण ठरू लागली आहेत. विशेषत: या प्रदर्शनात गुलाब, मोगरा, जासवंदी, जुई यासह इतर फुलांपासून विविध कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. फुलांच्या साहाय्याने सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तरुणाई सेल्फी घेण्यात दंग होवू लागली आहे.
पर्यावरण प्रेमींना प्रदर्शनाची भुरळ
याबरोबर मिरची, टोमॅटो, रताळी, केळी, पेरू, नारळ आणि कंदमुळे देखील प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. सेंद्रिय खतापासून तयार करण्यात आलेल्या फळांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्याबरोबर नैसर्गिक मध आणि फळा, फुलांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. त्यामुळे प्रदर्शन नागरिकांना आणि पर्यावरण प्रेमींना भुरळ घालू लागले आहे. रविवारपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना विनामूल्य खुले ठेवण्यात येणार आहे. शिवाय लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळच्यावेळेत आयोजित करण्यात आले आहेत.









