मंत्री एम. बी. पाटील यांचे आश्वासन
बेळगाव : होनगा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये आतापर्यंत खाता न मिळविलेल्या उद्योजकांनी अर्ज सादर केल्यास 31 दिवसांत खाता बनवून देण्यात येईल, अशी माहिती अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली. सुवर्णसौधमध्ये गुरुवारी उत्तर बेळगाव इंडस्ट्रियल युनियनच्या प्रतिनिधींसोबत विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्री एम. बी. पाटील यांनी बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी होनगा औद्योगिक वसाहतीत एकूण 233 उद्योग आहेत. त्यापैकी 202 उद्योगांसाठी सेल डीड झाले असून 131 उद्योगांना खाता मिळाले आहे. उर्वरित उद्योगांनाही खाता सुविधा करून द्यावी, अशी विनंती उद्योजकांनी केली. त्यामुळे एम. बी. पाटील यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना खाता बनवून देण्याचे आश्वासन दिले. होनगा औद्योगिक वसाहतीमध्ये काही समस्या प्रदीर्घ काळापासून रेंगाळत आहेत. खाता सुविधा पंचायतींमार्फत व्हावी. औद्योगिक वसाहतीतील भूखंडांसाठी अनेक वर्षांपासून मालमत्ता कर वसूल केलेला नाही. त्यामुळे गाईडेन्स व्हॅल्यू लागू करताना 2017 पासून मालमत्ता कर वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर सर्व उद्योजकांनी संमती दर्शविल्याचे मंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले. होनगा येथे असणाऱ्या कॅन्टीनच्या इमारतीत प्रशासकीय कार्यालय सुरू करण्याची मागणी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने केली आहे. त्यावरही सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल, असे ते म्हणाले. बैठकीत इंडस्ट्रियल युनियनचे अध्यक्ष शिवकुमार, उपाध्यक्ष अजित पाटील, नागेंद्र, ग्रामविकास खात्याचे मुख्य सचिव अंजूम परवेझ, उद्योग खात्याचे मुख्य सचिव सेल्वकुमार, खात्याचे संचालक रमेश, जिल्हाधिकारी नितेश पाटील आदी उपस्थित होते.