दरात वाढ न केल्यास भात न देण्याचा निर्णय
वार्ताहर /कडोली
ढगाळ वातावरणाच्या सावटाखालीच कडोली परिसरातील भात सुगी आणि मळणीची कामे उरकून घेण्याच्या घाईगडबडीत शेतकरी गुंतला असून इंद्रायणी भाताच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी वर्गात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पावसाच्या अत्यल्प प्रमाणात हजेरी झाल्याने भात उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. उरल्या सुरल्या भाताला चांगला दर मिळत असताना अचानक व्यापाऱ्यांनी क्विंटलमागे 300 ते 400 रूपये दर कमी केल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. यावर्षी कडोली परिसरात पावसाअभावी निम्म्याने भात उत्पादनात घट झाली आहे. अशा परिस्थितीत क्विंटलमागे भाताला 3700 ते 3800 रुपये दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत होते. पण, गेले दोन दिवस झाले भातदरात अचानक घसरण करण्यात आल्याने शेतकऱ्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांनी दरात वाढ केली नाही तर भात न देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
ढगाळ वातावरणामुळे चिंता
भात कापणी आणि मळणीच्या ऐन हंगामात ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भात कापणीची वेळ येऊन गेली आहे. भाताची लोंबे झडत आहेत. परिणामी नाईलाजास्तव शेतकऱ्यांना भात पिकाची कापणी करावी लागत आहे. शिवाय मळणीची कामे तितक्याच घाई गडबडीत करावी लागत आहे आणि अशातच मजूरही मिळेनाशी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी वैतागून गेला आहे.









