500 युनिट मोफत विजेची मागणी
बेळगाव : राज्यात 50 ते 60 लाख विणकर समाज आहे. राज्य सरकारकडून विणकरांना योग्य सुविधा दिल्या जात नसल्यामुळे आतापर्यंत 47 हून अधिक विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या धर्तीवर विणकरांसाठी कामगार सुविधांची तरतूद करावी व त्यांना कामगार कार्डचे वितरण करावे, यासह इतर मागण्यांसाठी बुधवारी सुवर्णविधानसौधसमोर राष्ट्रीय विणकर सेवा संघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. बेळगावसह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये विणकर समाज आहे. एप्रिल महिन्यात वीजदरवाढ करण्यात आली. त्यावेळी विणकरांनी जोरदार विरोध केल्यामुळे विणकरांना काही प्रमाणात सवलत देण्यात आली. परंतु, 20 एचपीपर्यंत वीजजोडणी असलेल्या विणकरांना 500 युनिट मोफत द्या व त्यापुढील प्रत्येक युनिटला 1 रुपये 25 पैसे दराने वीज देण्याची मागणी संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष शिवलिंग टिरकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी राजेंद्र मिरजी, मल्लय्या मिरजी, अर्जुन कुंभार, संग्याप्पा उदगल, लक्ष्मण दोनवरे यांसह गदग, हुबळी, धारवाड, कोलार, निपाणी, बनहट्टी या परिसरातील विणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
47 विणकरांची आत्महत्या
विणकरांचा व्यवसाय कमी होत चालला असून याचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होताना दिसत आहे. आतापर्यंत 47 विणकरांनी आत्महत्या केल्या असून त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये साहाय्यधन, तसेच संपूर्ण कर्जमाफी द्यावी, बँकांकडूनही विणकरांना सवलत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करण्याची मागणी राष्ट्रीय विणकर सेवा संघाच्यावतीने करण्यात आली.









