72 तास वीज, इंटरनेट बंद; हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे आपद्ग्रस्तांना अन्नपुरवठा
वृत्तसंस्था/ चेन्नई, भुवनेश्वर
बंगालच्या उपसागरातून पुढे सरकलेले चक्रीवादळ 5 डिसेंबर रोजी आंध्रप्रदेश किनारपट्टीवर धडकले. त्याआधी या वादळाने चेन्नईत मोठा विध्वंस केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे अनेक भाग पुरात बुडाले आहेत. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत अन्न पोहोचवले जात आहे. मिचौंग चक्रीवादळ बुधवारी तेलंगणात पोहोचल्यानंतर कमकुवत झाले. मात्र, दुसरीकडे चक्रीवादळामुळे ओडिशात पाऊस पडत आहे.
तामिळनाडूतील वादळामुळे चेन्नई शहर पाण्यात बुडाले, परिणामी 20 लोकांचा मृत्यू झाला. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर चक्रीवादळामुळे प्राण गमावलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला. पूराच्या विळख्यात अडकलेल्या अनेक भागात 72 तासांपासून वीज आणि इंटरनेट बंद होते. राज्यातील चेन्नई, चेंगलपट्टू, तिऊवल्लूर आणि कांचीपुरम जिह्यातील शाळांमध्ये होणाऱ्या सहामाही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये नियोजित वेळेवर परीक्षा सुरू होतील. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 5,060 कोटी ऊपयांची मदत मागितली आहे. तसेच द्रमुक खासदार टीआर बालू यांनी याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे.
ओडिशात कमकुवत
मिचौंग चक्रीवादळ कमकुवत होऊन कमी दाबाच्या क्षेत्रात ऊपांतरित झाल्यामुळे ओडिशाच्या दक्षिण भागात बुधवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गजपती जिल्हा प्रशासनाने मुसळधार पावसामुळे जिह्यातील सर्व शाळा बुधवारी बंद ठेवल्या होत्या. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्रात कमकुवत झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. आता चक्रीवादळामुळे ओडिशाला कोणताही धोका नाही. मात्र, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गंजम, गजपती, कालाहंडी, कंधमाल आणि नबरंगपूर जिह्यात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्मयता आहे. तत्पूर्वी मलकानगिरी, कोरापुट आणि रायगड जिह्यात मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. पाऊस ओसरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. अहवाल तपासल्यानंतर नुकसान भरपाई दिली जाईल.









