केएससीए ए डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड विभागीय ए डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ ने एसडीएम क्रिकेट अकादमी ब चा, अमृत पोतदार सीसीएने बीडीके हुबळी सी चा तर हुबळी स्पोर्ट्स क्लब अ ने हुबळी क्रिकेट अकादमी ब चा पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. राहुल सिंग, सुधीप सातेरी, अनमोल मातुर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए बेळगाव मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ ने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी बाद 279 धावा केल्या. त्यात सलामवीर सुधीप सातेरीने 11 चौकारांसह 106 धावा करत शतक झळकाविले. त्याला पार्थ पाटीलने 3 षटकार, 2 चौकारांसह 41, काविश मुकण्णावरने 4 चौकारांसह 40, अर्णव कुंदप व स्वप्नील हेळवे यांनी प्रत्येकी 20 तर आदर्श माळीने 18 धावा केल्या. एसडीएम धारवाडतर्फे दक्षनाथ वाजंत्रीने 48 धावात 4, बसवराजने 61 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसडीएम क्रिकेट अकादमी ब चा डाव 40.2 षटकात 175 धावात आटोपला. त्यात शहाबाज जे. ने 1 षटकार, 8 चौकारांसह 49, साईनाथ माळीने 3 षटकार, 4 चौकारांसह 52 तर संयुक्त पाटीलने 21 धावा केल्या.
बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे स्वप्नील हेळवेने 23 धावात 4, सिद्धेश असलकरने 33 धावात 4, विजय पाटील व पार्थ पाटीलने प्रत्येकी 1 गडी बाद केला.केएससी हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन सी संघाने प्रथम फलंदाजी करताना 23.4 षटकात सर्व गडी बाद 107 धावा केल्या. त्यात सुमीतने 8 चौकारांसह 41, गणेशने नाबाद 15 धावा केल्या. अमृत पोतदार सीसीआयतर्फे अनमोल मातुरने 8 धावात 4, जिनत मुडबागीलने 27 धावात 4, स्वयम अपण्णावर व कृष्णकुमारे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अमृत पोतदार सीसीआयने 17.4 षटकात 2 गडी बाद 108 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात अनमोल मातुरने 8 चौकारांसह नाबाद 52, जित गदीगयने 23, गौतमने नाबाद 11 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब अ ने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्व गडी बाद 291 धावा केल्या. त्यात राहुलसिंग रावतने 4 षटकार, 8 चौकारांसह 93, रोहन यारीसिमीने 11 चौकारांसह 82, चिराग नायकने 1 षटकार, 8 चौकारांसह 70 तर सुधन्वा कुलकर्णीने 17 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाचा डाव 47 षटकात 201 धावात आटोपला. त्यात मनिकांत बुकीटकरने 4 चौकारांसह नाबाद 60, अमोद कालवेने 1 षटकार, 6 चौकारांसह 55 तर विकास दोडमनी व पुनीत दिक्षित यांनी प्रत्येकी 27 धावा केल्या. हुबळी क्लबतर्फे प्रणव भाटीयाने 41 धावात 4, रोहित कुमार एसने 32 धावात 3, गडी बाद केले.









