सिंधुदुर्गात पार पडलेल्या भारतीय नौसेना दिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किल्ले सिंधुदुर्गप्रती तीर्थक्षेत्राचा भाव निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे आगामी काळात कोकणच्या पर्यटन वाढीमध्ये सिंधुदुर्ग किल्ला प्रमुख आकर्षण ठरणार आहे. हे नौदल दिन कार्यक्रमाचे मोठे फलित आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांनी कोकण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत विविध विकास योजनांचे सुतोवाच केले. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यातून कोकण विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने कोकणचा दौरा केला होता. मात्र यावेळी नौदल दिनाच्या निमित्ताने कोकणचा दौरा करून खऱ्या अर्थाने कोकणच्या विकास पर्वाला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक आहेत. त्यांचीच प्रेरणा घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ठिकाणी यावर्षीचा भारतीय नौदल दिन साजरा करण्यासाठी जागा निवडण्यात आली आणि गेल्या चार महिन्यांपासून नौदल कार्यक्रमाची अभूतपूर्व तयारी भारतीय नौदल आणि महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आली. या अभूतपूर्व नियोजनबद्ध तयारीमुळे नौसेना दिनाचा ऐतिहासिक सोहळा यशस्वीपणे पार पडला.
भारतीय नौदल दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालवणमधील ऐतिहासिक राजकोट किल्ल्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यामुळे राजकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त झाले आहे. नौदल दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकोट, मालवण शहर, तारकर्ली आणि आजुबाजूच्या परिसरातील सुशोभिकरणाने मालवणचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. त्याचा फायदा आगामी काळात कोकणच्या पर्यटन वाढीसाठी निश्चितपणे होणार आहे.
भारतीय नौदल दिनाचा प्रमुख कार्यक्रम तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यपाल रमेश बैस, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार यांच्यासह राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व मान्यवर उपस्थित होते. नौदल दिन कार्यक्रमाचा हा ऐतिहासिक सोहळा याची देहा याची डोळा पाहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह परजिल्ह्यातून हजारो नागरिक तारकर्लीच्या समुद्र किनारी दाखल झाले होते. यावेळी भारतीय नौसैनिकांच्या तेजस, मिग,
डॉर्निअर, चेतक, एअर क्राफ्ट व हेलिकॉप्टरनी चित्तथरारक प्रात्यक्षिके केली.
नौसेना दिनाच्या या कार्यक्रमात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचे सामर्थ्य ओळखले होते. तोच वारसा पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. त्यामुळे देशाची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्वांगिण विकासासाठी सीमावर्ती गावे ही अंतिम गावे नसून देशाच्या सीमांची सुरुवात होणारी पहिली गावे आहेत, असे मानून विकास केला जात आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मालवणमध्ये नौदल दिन साजरा होणे फार मोठे भाग्य असून त्यामुळे कोकणच्या विकासाला चालना मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान सिंधुदुर्गात आले, हा आनंदाचा क्षण असून कोकणच्या विकासाला त्याचा फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. सर्वांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे कोकणच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट केले.
जगावर राज्य गाजवायचे असेल, तर समुद्रावर वर्चस्व आवश्यक आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जाणले होते. यासाठीच त्यांनी सिंधुदुर्गसारखे अनेक जलदुर्ग अरबी सागरात उभारले. त्याचप्रमाणे स्वत:चे नौदल स्थापन केले. म्हणूनच छत्रपतींना भारतीय आरमाराचे जनक मानले जाते. विशेष म्हणजे छत्रपतींनी या आरमाराचा शुभारंभ किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने कोकणच्या पवित्र भूमीत केला आणि आज भारतीय नौदलाचा वर्धापन दिन साजरा करण्याचे भाग्य नौदलाच्या जन्मभूमीत लाभले. हा सर्व सोहळा भारतीयांसाठी गौरवाचा व अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्गचा गौरव केला. भारतीय किनारपट्टीच्या सुरक्षेबरोबरच किनारपट्टीवरील पारंपरिक रहिवासी व पारंपरिक उद्योग व्यवसायांच्या मजबुतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणचे हे क्षेत्र वैविध्याने नटलेले आहे. कोकणच्या विकासासाठी आमचे सरकार नियोजनबद्धरित्या काम करीत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग, परभणी, धाराशिवमध्ये वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली. चिपी विमानतळ सुरू झाले आहे. काजू बागायतदारांसाठीही विशेष योजना तयार केल्या जात आहेत. समुद्र किनारी वसलेल्या गावांचे संरक्षण करण्यासाठी कांदळवन क्षेत्र वाढीची योजना मालवण, आचरा, रत्नागिरी, देवगड, विजयदुर्गसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. मच्छीमारांना सहाय्य करण्यासाठीही कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांच्यासाठी विमा सुरक्षा कवच दोन लाखावरून पाच लाख केले. किसान क्रेडिट कार्डचा लाभ मच्छीमारांना पहिल्यांदा मिळवून दिला आहे. सरकार आज सागरमाला योजनेतून भारताला लाभलेल्या समुद्र किनारपट्टीवर आधुनिक कनेक्टीव्हीटीवर भर देत आहे. जेणे करून समुद्र किनारी नवे उद्योगधंदे उभारले जातील. मासे आणि मत्स्य खाद्याला जगभरात मोठी मागणी आहे. त्यामुळे मत्स्यखाद्य प्रक्रियेवर आधारित उद्योगांवर भर देऊन मच्छीमार नौकांच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून मदत दिली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात उभे राहिलेले किल्ले हा आपला गौरवशाली वारसा आहे. हा वारसा जपण्याकरिता गड-किल्ल्यांच्या संरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे. कोकणसह महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. देशभरातील लोक हा गौरवशाली वारसा पाहण्यासाठी यावेत, हा प्रयत्न असून त्यामुळे पर्यटन वाढेल, रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला व कोकणच्या पर्यटन विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.
एकूणच नौसेना दिन कार्यक्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोकण दौरा कोकणच्या विकासाचे नवे पर्व सुरू करणारा ठरला आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहेच. त्याचबरोबर नौसेना दिन येथे साजरा करून इतिहास जागविण्यात आला. त्यामुळे पर्यटनवाढीच्या दृष्टीने किल्ले सिंधुदुर्ग प्रती तीर्थक्षेत्राचा भाव निर्माण होईल, हा पंतप्रधानांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरेल, असे निश्चित वाटते.
संदीप गावडे








