सरवडे प्रतिनिधी
बिद्री ता .येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरू झाली. १२० टेबलवरती ही मतमोजणी सुरू आहे. सुरवातीला केंद्रवाईज ५०-५० मतांचे पॅनल टू पॅनेल झालेले मतदान अशी विभागणी करण्यात आली. यामध्ये काही केंद्रावर सत्ताधारी गटाचे तर काही केंद्रावर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे उमेदवार आघाडीवर राहत होते.
परिवर्तन आघाडीच्या नेत्यांना राधानगरी तालुक्यातुन मोठी आघाडी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु सत्तारुढ गटाने येथे लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्याने परिवर्तनला अपेक्षित लीड मिळाले नाही. तर सत्ताधारी महालक्ष्मी आघाडीने अपेक्षेप्रमाणे कागल तालुक्यात आघाडी घेतली. शिवाय पहिल्या फेरीत मोजलेल्या मतांमध्ये वाघापूर, मुधाळ, गंगापूर आदी गावांत महालक्ष्मी आघाडीचे विमान आघाडीवर राहिले. त्यामुळे सत्ताधारी आघाडी विजयाच्या दिशेने निघाली.
फेरी क्र. १ मध्ये राधानगरीतील ५१, कागलमधील ४८ तर भुदरगडमधील २१ अशा १२० गावांतील ३५ हजार ४८९ मतदान मोजण्यात आले. यामध्ये सत्ताधारी आघाडीचे उमेदवार एक हजार ते पंधराशे मतांनी आघाडीवर होते. फेरी क्र. २ मध्ये भुदरगडमधील ४२ आणि करवीरमधील ११ अशा ५३ गावांतील १४ हजार ४५१ मतदान मोजले जाणार आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार असून मतमोजणीचा कल पाहता सत्तारुढ गटच पुन्हा बिद्रीत सत्तेवर येईल असा अंदाज आहे.